Wednesday, April 4, 2018

एक अमूल्य भेट


 गरम गरम वाफाळलेल्या चहाचा एक घोट घेतला आणि सकाळी सकाळी डोळ्यांवर आलेली आळसावलेली झोप क्षणात नाहीशी झाली. मी आणि बायको कुठल्याशा इकडच्या तिकडच्या विषयांवर गप्पा मारत चहाचा आस्वाद घेत हॉलमध्ये बसलो होतो. छोटी समा शेजारीच तिचा खेळ मांडून त्यात मग्न झाली होती.त्या बैठकीतच उद्याच्या गुढीपाडव्याच्या तयारीला लागणाऱ्या सामानाची यादी चर्चेत आली आणि नवीन वर्षाची खऱ्या अर्थाने चाहूल लागली. गप्पा रंगल्या होत्या. आणि इतक्यात माझे लक्ष समोरच्या टेबलवर गेले. मी चहाचा कप हातात घेऊनच उठलो आणि टेबलजवळ गेलो,
" काहीतरी पार्सल आलेलं दिसतंय."
म्हणत मी ते हातात घेऊन पुन्हा आपल्या जागी येऊन बसलो.
" हो . कालच आले होते हे. तुमच्यासाठी होते म्हणून असेच ठेवले होते. आता सांगणारच होते मी. . तूम्ही बघा . मी तयारीला लागते आता . "
असे सांगून रिकामे कप घेऊन बायको किचनमध्ये निघून गेली. मी मात्र त्या पार्सलला अजूनही न्याहाळातच होतो. दिसायला नेहमीसारखे एक मोठे पाकीट होते पण इतर पाकिटांपेक्षा वजनाने जाड वाटत होते . त्यावर अगदी टपोऱ्या अक्षरांत माझे नाव 'चित्रकार निलेश जाधव ' आणि त्याखाली माझ्या घराचा पत्ता लिहिला होता. प्रेषक स्थानी माझी नजर गेली तर ते नाव आणि गाव देखील फारसे ओळखीचे वाटले नाही. खूप साऱ्या कागदांचा गठ्ठा असावा असा भास झाला ते पार्सल हातात घेतले तेव्हा आणि एक वेगळीच उत्सुकता मनाला बिलगून गेली.काय असेल बरे यात आणि नक्की कोणी पाठवले असेल बरे ? मनात अशा प्रश्नांची गर्दी होण्या आधीच मी ते पाकीट उघडण्यास सुरुवात केली. एक कडा उलगडली आणि आत डोकावून पाहिले तर काय ?... पोस्टकार्डस. कित्ती वर्षांनी पाहत होतो मी ही अशी पत्रे. ते पाहून उत्सुकता पार शिगेला पोहोचली आणि मी क्षणही न दवडता सारी पोस्टकार्डे पाकिटाबाहेर काढली. एव्हाना समा तिथे येऊन पोहोचली होती. तिच्यासाठी तर पोस्टकार्ड हा एक नवीनच प्रकार होता.
" बाबा , हे काय आहे ?आणि इतकी सारी? कोणी पाठवली ?"
समाच्या प्रश्नांचा पर्वचा सुरु झाला पण तिच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मला तरी कुठे सर्व माहित होते. आणि त्या क्षणी मी खरंच हरवून गेलो होतो. तेव्हा समाच्या आईनेच तिच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.
" अगं समा , ही पोस्टकार्ड्स आहेत. पूर्वी जेव्हा आतासारखा फोन अस्तित्वात नव्हता तेव्हा निरोप सांगण्या-आणण्यासाठी यांचाच उपयोग होत असे. आपल्या दूरच्या लोकांना निरोप द्यायचा असेल तर असे पत्र लिहून टपालात टाकायचे आणि मग पोस्टमन काका ते पत्र अचूक पत्यावर पोहोचवायचे आणि मग त्या निरोपाचे उत्तर देखील याच मार्गाने परत यायचे. ते ही काही वेगळेच दिवस होते, नाही का रे ? पण मला एक कळत नाही आजच्या व्हाट्सअपच्या जगात तुम्हाला अशी एवढी पत्रे आली कुठून आणि पाठवली कुणी ?"
" अगं हो. तेच पाहतो आहे मी . बघ ना कित्ती सुंदर आणि वेगवेगळी शुभेच्छापत्रे आहेत ही !"
आणि एक पत्र हातात घेतले. अतिशय बोलक्या अक्षरांत आणि शब्दांत माझ्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा त्यात कोरल्या होत्या. सोबत गुढीचे एक सुंदर चित्र देखील त्या भेटकार्डाची शोभा वाढवत होते... घराबाहेर उंच वेळूच्या काठीवर उभारलेली ती माथ्यावर तांब्याचा कलश , हिरवागार लिंबफाटा,फुलांच्या माळा , नक्षीदार साखरगाठी,जरीसाडीसोबत सजलेली ती चित्रगुढी तर मला आत्ताशीच येणाऱ्या नववर्षाची जाणीव करून देत होती. ते पत्र तसेच हातात ठेवून मी दुसऱ्या हातात दुसरे कार्ड घेतले. त्यातही एका सुंदर सजलेल्या गुढीसोबत माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा होत्या. अशी १-२ नव्हे तर एकूण २२ पत्रे होती.... निरनिराळ्या ढंगातली आणि वेगवेगळ्या रंगांतली .प्रत्येक पत्रातील अक्षरे आणि शब्द जरी वेगळे तरी त्यातून माझ्यासाठी होत्या फक्त आणि फक्त शुभेच्छा... सुंदर शुभेच्छा ... रंगीत शुभेच्छा...सुखदायी शुभेच्छा... आनंद देणाऱ्या शुभेच्छा... भारावून टाकणाऱ्या शुभेच्छा. हो खरंच , हे सर्व पाहून मी अगदी भारावून गेलो होतो. कोणत्याही कलाकारासाठी आपल्या कलारसिकांकडून मिळालेले असे प्रेम खरेच अनमोल असेल. आम्ही तिघे या पत्रांमध्ये अगदी गुंग झालो होतो. आणि इतक्यात समोर आला समाचा पुढचा प्रश्न -
" हे चित्र छोट्या मुलाने काढले आहे का ?"
हो खरेच की , चित्रे आणि अक्षरांवरुन तरी ती शाळेतल्या मुलांची पत्रे असावीत असा अंदाज आम्ही बांधला. पुन्हा एकवार पत्रांना उलटापालट करून नाव-पत्ते शोधले तेव्हा त्यांच्या कलाशिक्षकांचे पत्र हाती आले आणि मग ध्यानात आले कि ही सर्व सोलापूरमधील बादोले गावातील एका शाळेतील सहावी इयत्तेतील मुले.पुढे वाचत गेलो तसे त्यांच्या पत्रांतून कळले कि वर्तमानपत्रे , मासिकांतून प्रकाशित होणारी माझी चित्रे या मुलांनी अनेकदा पाहिली , त्यांना ती फार आवडली आणि आपल्या चित्रकलेच्या शिक्षकाच्या मदतीने मान्यवरांशी पत्रव्यवहार करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून त्यांनी माझ्यासाठी आज ही अशी सुंदर शुभेच्छापत्रे तयार करून माझ्यापर्यंत पोहोचवली.वाह ! किती तो आदर आणि किती हे प्रेम ! एका कलाकाराला यापेक्षा अधिक काय हवे असेल ?

 खरेच आजच्या व्हाट्सएपच्या काळात , जिथे आपण एखादा शुभेच्छा मेसेज कॉपी आणि पेस्ट करून अगदी सर्रासपणे पुढे पाठवतो आणि अशाप्रकारे आपल्या भावना व्यक्त करून पूर्णविराम लावतो तिथे या अशा मुलांचे आणि  मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या शिक्षकाचे विशेष कौतुक वाटते. आज दुर्मिळ होत जाणाऱ्या पोस्टकार्डांवर स्वतःच्या हातांनी कलाकारी करून ते असे दूरच्या प्रिय व्यक्तीपर्यंत पाठवण्याचा हा खटाटोप पण तोही त्यांना आनंद आणि समाधान मिळवून जातो. यातून आज आपल्याला खरेच खूप काही शिकता येईल आणि ते शिकायलाही  हवे. 

मी सर्व पत्रे पुन्हा तशीच जपून पाकिटात ठेवली. ती पत्रे आता कपाटात बंदिस्त झाली होती पण माझ्या विचारांना मात्र एक नवीनच चालना आज त्यांनी दिली जणू. नकळत माझे बालपण मनाच्या झरोक्यातून डोकावून गेले. मित्रांसोबत शेअर केलेल्या सुट्टीतल्या गंमती जंमती , दूरच्या बहिणींसोबत केलेली राख्या आणि भेटकार्डांची देवाणघेवाण , दूरच्या चुलतभावंडांसोबतच्या गप्पागोष्टी सारे सारे आज त्या पत्रांमुळे आठवत गेले ... कितीतरी प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोरून तरळत गेले. आज या तंत्र आणि यंत्रांच्या दुनियेत खरेच ते 'आईचे पत्र' हरवले आहे. आज मला ते पुन्हा सापडले आणि आता मी ठरवले कि ते आता पुन्हा मुळीच गमवायचे नाही.


 त्यानंतर मनात आले , कुठल्या तरी दूरच्या गावातील मुलांनी आणि शिक्षकाने माझ्यासाठी इतके श्रम घेऊन आनंदाने मला आज ही भेट दिली. मग मलाही त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे. पण काय करावे ? या विचारात ती पत्रे,त्यांतील शब्द ,अक्षरे ,चित्रे कितीदातरी या दृष्टिपटलावर नाचत राहिली. आणि मग अचानक काहीतरी गवसले. अनेक पत्रांचा शेवट होता ,' कळावे. तुमच्या उत्तराची अपेक्षा करतो . वाट पाहतो '. आणि एक कल्पना सुचली. मी माझ्या काही चित्रांच्या प्रिंट्स घेतल्या आणि . त्यामागे स्वतःच्या हातांनी त्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा लिहिल्या. आणि अशी ती स्वरचित पत्रे पोस्ट करताना मला स्वतःला जे समाधान आणि आनंद मिळत होता तो कोणत्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हता.

- रुपाली ठोंबरे .


1 comment:

Blogs I follow :