Tuesday, October 31, 2017

एक तेजोमय तारा

कधी कधी आयुष्यात एका वळणावर अचानक एक विचित्र काळोख दाटलेला आढळतो. भविष्यातले पुढचे सोडाच अगदी जवळचे आसपासचेही काही दिसेनासे होते. आपलेच वाटणारे सर्व फार दूर जात एकाएकी धूसर होत जातात. कित्येक विश्वासांना एकाच क्षणी तडा गेलेला असतो. नशिबाच्या नावेवरती झोके घेत एका विचित्र वादळात हा जीव हेलकावे खात असतो. त्या क्षणी खूप भीती वाटते. जीव घाबराघुबरा होतो कारण अशा क्षणांत आपल्या वाईटाची वाट पाहणाऱ्या घुबडा-गिधाडांचे  किती तरी डोळे दूरवर दिसत असतात. नावेतून अचानक तोल गेला तर.... ? या मिट्ट काळोखात जीव गुदमरून गेला तर ...? अशा नाना प्रश्नांनी जीव त्रासून गेलेला असताना मग सुरु होतो परमेश्वराचा नामजप. कारण त्याशिवाय कोणताही उपाय दिसत नाही. देवा तू येऊन सर्व ठीक करावे अशी अपेक्षा त्या वेळी नक्कीच नसते तर अपेक्षा असते आपल्या प्रयत्नांना यश मिळण्याची...संकटात हिम्मत देणाऱ्या एका आशीर्वादाची. 

आणि मग अशा भयाण अंधारात चाचपडत असताना एक मिणमिणता तारा दृष्टीस पडतो. अरे हे काय ? हा तर माझ्याच दिशेने येत आहे. प्रखर होत आता तो दिव्य प्रकाश माझ्या अगदी जवळ आला. त्याच्या असंख्य तेजकणांनी हा जीव पुन्हा जिवंत झाला. काही काळापूर्वी वाटणारी भीती आता कुठच्या कुठे नष्ट झाली. वादळातही मन घट्ट झाले आणि आसपास वाहू लागले आनंदाचे गार वारे. अचानक एक वेगळाच विश्वास अंगी संचारला. गुदमरत असलेला जीव आता मुक्त झाला, त्याला स्वप्नांचे अनंत पंख फुटू लागले जे आकाशात झेप घेण्यास उत्सुक होते. आनंदाच्या भरतीच्या उधाणातही मन स्थिर ठेवण्याची बुद्धी निर्माण झाली. प्रयत्नांना यश किंवा अपयश आले तरी त्या विश्वासाचे कवच इतके कठीण होते कि हिम्मत जरा देखील ढळली नाही.उलट त्याच्या सतत मार्गदर्शनाने ती हिम्मत नेहमीच कणाकणाने वाढत राहिली. प्रत्येक पावलावर येणारे संकट आता एक नवे आव्हान वाटू लागले. त्याला स्वीकारण्याची आणि पूर्ण करण्याची एक दिव्य शक्ती त्या तेजस्वी दिव्याकडून मिळाली. या शक्तीच्या साहाय्याने कितीतरी दूर प्रयत्नपूर्वक चालत राहिल्यावर एक जग लागले... सुंदर , प्रकाशित, हवेहवेसे वाटणारे, जे त्या क्षणापर्यंत कुठेतरी खोल लुप्त होते. मी हळूच त्या स्वप्नाच्या जगात शिरले. पण तो प्रकाश सदा माझ्या ह्रदयाच्या एका कप्यात साठून होता. त्याचा निरोप घ्यावासा कधी वाटलेच नाही. तो इवलासा तारा नाही तर माझ्यासाठी तो सूर्यच होता जो फक्त माझ्यासाठीच तेव्हा उगवला होता असेच वाटत होते.माझ्यासारख्या हजारो जीवांना प्रकाशमान करणारा हा सूर्य नियमित माझ्या आठवणींच्या आकाशात स्वैर करत असतो.खरेच कधी कधी या आभासी सुंदर स्वार्थी जगात या कोलाहलातही खूप एकटे वाटते, अनेकदा त्या तेजाची उणीव भासते आणि तेव्हा तेव्हा त्या प्रकाशाने निर्माण केलेली माझ्यातील सकारात्मक ऊर्जा कामी येते. पुन्हा एकदा हेलकावे घेत असलेला जीव तोल सांभाळतो, नव्या पंखांना स्वप्नांचे नवे पर येतात आणि आकाशी झेप घेण्यासाठी मन तयार होते. 

माझ्यासारख्याच कितीतरी मुलांवर हा देवदूत गेल्या कित्येक वर्षांपासून माया करत होता. त्या प्रेमाच्या स्पर्शात नेहमीच एक दिव्य शक्ती होती. त्याच्या सहवासात एक विश्वसनीय आधार होता. एका छोट्याशा खाडीकिनारी वसलेल्या गावाला शैक्षणिक महत्त्व प्राप्त झाले ते याच देवदूतामुळे. कितीतरी विद्यार्थ्यांचे भविष्यच फक्त उजळले नाही तर त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक विद्यार्थी एक आदर्श मानव बनला. अनेक अनाथांना हक्काचा नाथ वयाच्या योग्य वेळी मिळाला आणि त्यांच्या जीवनास एक अर्थ प्राप्त झाला.फादर ऑर्लॅंडो म्हणजे फक्त शिक्षणाचीच नव्हे तर मायेची,शिस्तीची,वात्सल्यतेची ,धर्मनिरपेक्षतेची, अजोड परिश्रमाची, साकारत्मकतेची प्रतिमा होती. एक अनोखे व्यक्तिमत्त्व ज्यांच्याही सहवासात आले त्यांचे जीवन आज फुलले आहे. पण म्हणतात ना, देव त्याचा एक अंश मानव कल्याणासाठी पृथ्वीवर पाठवतो आणि त्याचे कार्य समाप्त झाले कि तो अंश पुन्हा त्या दैवी अनंतात विलीन होतो. २९ ऑक्टोबर २०१७ रोजी एका अशाच दैवी अंशाचा, अनेक जीवांना प्रकाशित करणाऱ्या दिव्य ज्योतीचा अखेर त्या अनंत सूर्याच्या स्वर्गतेजात प्रवेश झाला. 
त्या तेजस्वी ताऱ्यास भावपूर्ण श्रद्धांजली !!!


फादर ऑर्लॅंडो, तुमच्या मुळेच आज माझ्या जीवनाला एक नवा आकार आणि अर्थ मिळाला. माझ्या या सुंदर जीवनाचे जर कोणी शिल्पकार असेल तर ते तुम्हीच.माझ्यावर तुम्ही ठेवलेल्या अतूट विश्वासामुळेच आज मी इथवर पोहोचली आहे असे वाटते. खरेच तुमच्यासारख्या निःस्वार्थी लोकांची या जगात खूप कमी आहे आणि मी खरोखर खूप धन्य आहे जिला हा सहवास अगदी जवळून लाभला. आयुष्याची १९ वर्षे मी तुमच्या छत्रछायेत वाढत गेले... शिक्षणाने , विचारांनी आणि जगायला शिकवणाऱ्या प्रत्येक गोष्टीने.लहानपणी वाढदिवसादिवशी तुम्हाला पाहणे म्हणजे एक कुतूहल वाटे ,कॉलेजमध्ये असताना तुमच्या सोबत केलेले विचारविनिमय, कॉलेजमध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून वावरत असताना टेलीफोनवरही बोलताना वाटणारी भीती आणि हॉस्टेलमध्ये असताना घडलेल्या गमती जमती, एकदा तुमचे पोर्ट्रेट काढण्याचा माझा प्रयत्न आणि त्यानंतरची तुमची कौतुकाची थाप ,माझ्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या दहावीच्या निकालाचे तुमच्या हातून मिळालेले पारितोषिक , जेव्हाही मी अडचणीत सापडेल तेव्हा तुमचे देवदूतासारखे समोर उभे असणे , गेल्या ५-६ वर्षांतल्या भेटी ... आजही त्या सर्व आठवणी या मनाच्या तारांगणात तेजोमय आहेत. माझ्यासाठी पितृतुल्य असलेल्या तुमच्याकडून मला फक्त मदतच नाही तर जगावे कसे हा अमूल्य धडा मिळाला. तुमच्या कडून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या, शिक्षणाच्या , मायेच्या,विश्वासाच्या,ज्ञानप्रकाशाच्या आणि तुमच्या सोबत असलेल्या सर्वच आठवणींच्या स्वरूपात तुम्ही नेहमीच आमच्या सोबत राहाल.  

Rest In Peace ... Miss you !!!
 - रुपाली ठोंबरे.

Wednesday, October 25, 2017

Golden drops of life

आजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून...आणि त्यासोबत माझी संबंध सकाळ उजळून निघाली. तुम्ही म्हणाल पहाटेचे साखरझोपेतले स्वप्न बिप्न पाहिले असेल या वेडीने. पण तुमचा हाही अंदाज चुकला बरे का!

जे जे मनात वसते ते सारे स्वप्नातच पाहायला हवे असे थोडीच आहे. आणि त्यासाठीच तर देवाने आपणा प्रत्येकाला एक कलेचे दुपटे आपल्यासोबत पाठविले आहे. कोणाला नृत्य तर कोणाला गायन , कोणी लिहिण्यात तर कोणी रेखाटण्यात स्वतःला व्यक्त करत असतो. मीही दैवकृपेने अशाच एका कलेने बऱ्यापैकी समृद्ध आहे आणि त्यातूनच आज हा माझ्या कल्पनेतला सूर्य मी समोर कॅन्व्हासवर निर्माण केला. आणि या सूर्याच्या निर्माणाने एका वेगळ्याच आनंदात मी स्वतःला न्हाऊन घेतले.

Aboriginal आर्ट माझ्यासाठी एक नवीन पण खूप सुंदर चित्रप्रकार. नेटवर काही शोधता शोधता ऑस्ट्रेलिया मधील या चित्रकलेशी परिचय झाला. फक्त ठिपके आणि काही विशिष्ट संज्ञाचित्र वापरून तयार केलेले चित्र. यात कसोटी असेल ती तुम्ही निवडलेल्या रंगसंगतीची. पाहता क्षणीच मी या चित्रांच्या प्रेमात पडले. वर वर पाहायला सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते काढायला बसणे म्हणजे तुमच्या धीर-चिकाटीची परीक्षाच. अचूक रंगसंगती आणि एकाच वलयातील विविध ठिपक्यांच्या आकारातील साम्य यावर त्या चित्राचे सौन्दर्य अवलंबून असते.

बहुदा या प्रकारात पाल , बेडूक साप ,कासव ,कांगारू असे विविध प्रकारचे प्राणी चितारले जातात आणि ते खरोखर सुंदरही दिसतात. पण घरातल्या हॉलसाठी काही बनवते आहे म्हटल्यावर काहीतरी वेगळे आणि ऊर्जा देणारे काही करूया असा विचार केला. आणि मग कल्पनेतला सूर्य हळूहळू ठिपक्या ठिपक्यांनी कागदावर उतरू लागला. रात्रीच्या काळोखात सुरु केलेला हा ठिपक्यांचा खेळ सकाळी अंदाजे ७-७.१५ वाजता संपला आणि त्यातून निर्माण झालेल्या सूर्यकिरणांमुळे खरोखर अंगभर आनंदाचे ओहोळ वाहू लागले.एकाच वेळी असंख्य समाधानाचे क्षण माझ्या दिशेने धावू लागले. खरेतर कमी झोप झाल्यामुळे आणि एकाच ठिकाणी बसून राहिल्याने एक प्रकारचा आळस किंवा निरुत्साह अपेक्षित असतो पण उलट नेहमीपेक्षा आज अधिक प्रसन्न वाटत होते. त्या प्रत्येक सोन्याच्या कणातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा असेल का कि ही आणखी कोणती नवी जादू?


Golden drops of life showered by Sun
ही अद्भूत जादू तर आहेच, केवळ माझ्याच नव्हे तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात लपलेली असते. जादू... आपल्या आवडत्या छंदाची.' जे न दिसे स्वप्नी ते ते सारे दिसे या कविमनी ' या उक्तीप्रमाणे एका कलाकारास देवाने कला ही इतकी मोठी देण दिली आहे कि ज्यामुळे अशक्यही शक्य करण्याची ताकद प्रत्येकात निर्माण होते. आणि जे जे आवडते ते ते करायला थकवा कधीच आड येत नाही. आणि आजच्या धकाधकीच्या थकलेल्या जीवनात अशा कलेच्या माध्यमातून नवा उत्साह आणि नवीन ऊर्जा मिळवण्याचा हा एक अतिशय सोपा उपाय.आज प्रत्येकाकडे वेळ मिळत नाही हे एक अपेक्षित तयार कारण जरी असले तरी स्वतःच्या आनंदासाठी आणि इतरांच्या सुखासाठी तो थोडासा काढण्यात काही गैर नाही. खरे तर मी तर म्हणेन वेळ हा कधीच मिळत नसतो तो नेहमी काढावा लागतो फक्त आपल्या हातात असलेला त्याचा अग्रक्रम आपण कोणत्या गोष्टीला देतो ते महत्त्वाचे.

मग चला तर आजपासूनच या सांसारिक आणि व्यावसायिक जीवनात गुरफटून गेलेल्या मनाला थोडे मोकळे करूया, त्याच्यासोबत दोन गप्पा मारूया , नक्की तुला सुखी होण्यासाठी काय आवडते ते पाहूया आणि मग बघा स्वतःलाच आपल्यातील कलेचा एक झरा सापडेल ज्यातून येणाऱ्या जीवनाची गोडी क्वचितच इतर कोणत्या सुखात मिळेल. तो छंद म्हणून जवळ घ्या , त्याला मनापासून जोपासा आणि मग त्यातून वाहणारी आनंदाची नदी एका विशाल सुखसागराकडे घेऊन जाईल जिथल्या शिंपल्यातही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावेसे वाटेल. आणि कोणास ठाऊक एखादे दिवशी सुयोगाने स्वाती नक्षत्रात एखादा पावसाचा थेंब त्या शिंपल्यात प्रवेश करेल आणि आपल्या अर्थहीन जीवनाचा अनमोल मोती तयार होईल.


- रुपाली ठोंबरे.

Tuesday, October 17, 2017

पावसाळी दिवाळीच्या रिमझिम शुभेच्छा.

" आई, मला भुईचक्र पाहिजे , पाऊस पाहिजे "
" अरे विनू , इतका नको तो पाऊस पडतोच आहे कि. त्यात तुला आणखी काय पाऊस पाहिजे आहे आता "
शेजारच्या घरात सुरु असलेला विनू आणि त्याच्या आईचा हा संवाद कानावर पडला. आणि मनात एक चक्र सहजच सुरु झाले. चक्र ... दिवाळीच्या या ५ दिवसांचे...दरवर्षी नव्याने येणारे जे आज खूपच निराळे झाले आहे... निसर्गाच्या बदललेल्या ऋतुचक्रामुळे.


हा पाऊस जातो जातो म्हणतो
आणि कुणास ठाऊक का हा जातच नाही
गणपती पावसात चिंब भिजून गेले
यावर्षी रास-गरबाही पाण्यातच रंगला
ऑक्टोबरची गरमी ची चिंता वाटावी
तिथे  ऐन दिवाळीतसुद्धा पाऊस सरी
आणि तो ही रिमझिम थेंबथेंब नव्हे
तर मुसळधार कोसळणाऱ्या धारा
आपण म्हणतो,
आम्ही दिवाळीचे स्वरूप बदलले
पण आता आणि आज पाहून वाटते
निसर्गानेही दिवाळीत आपले रूप पालटले
जून आहे कि ऑक्टोबर हे जसे न सुटलेले कोडे तसेच
इतरांप्रमाणेच मलाही खरंच कळत नाही हो यावर्षी 
नक्की चकली,करंजी तळावी कि तळावी कांदाभजी
कळतच नाही मुळी... हिवाळा सुरु आहे कि सुरु झाला पावसाळा ?
आधी कशी दिवाळी म्हटली
कि असायची खूप मोट्ठी खरेदी
नवे कपडे,नवे दिवे, नवे फटाके
आणि आता खरेदी तर असतेच हो
पण ती फक्त तांत्रिक आणि चायनीज
यावर्षी तर अशा खरेदीलाही
साधा एक दिवस मोकळा मिळत नाही
संध्याकाळी पाच वाजले किंवा सुट्टीचा वार आला
कि आलाच हा आभाळात दडून बसलेला पाऊस दारात
आधी कसे डबे भरून फराळ असायचा
आता नावापुरती मिठाई असते प्रत्येकघरी
पण या वर्षी तीही करायला अनेक अडचणी
ना वाळवायची सोय ना साठवण्याची हवा
नावापुरता केलेला फराळसुद्धा
दोन दिवसांनी खावासा वाटत नाही
पूर्वी अंगणात एखादी ठिपक्यांची रांगोळी सहज रेखली जाई
आता रांगोळ्यांचे स्वरूप बदलून ठसे रंगू लागले घरासमोर
आज तर ते ही रंग काही काळातच पाण्याने वाहून नेले
पूर्वी उटण्याचे अभ्यंगस्नान म्हणजे खरी दिवाळी
आता सुवासिक साबणांत सुवासिक होते दिवाळी
या वर्षी तर मातीच्या सरीस्पर्शानी गंधाळली दिवाळी
पूर्वी तेलाच्या मातीच्या दिव्यांनी अंगणात तारांगण अवतरायचे 
हल्ली मेणाच्या सुशोभित दिव्यांनी तेच तारांगण रंगीत भासायचे 
आज तर पाऊस-स्पर्शाने हे तारांगण विरून उरतो तो फक्त अंधार 
जो पुन्हा पुन्हा दूर होईल नव्या तेजाने , नव्या जाणिवेने
दिवाळी दिवशी आकाशी चांदण्यांचा सडा असे
आज मेघांच्या गडद चादरीत चांदण्या दिसेचना
पूर्वी रोज रात्री सर्वत्र दिव्यांचा लखलखाट असे
यावर्षी तर आकाशातसुद्धा आहे विजेचा लखलखाट
थोडक्यात काय निसर्ग सुद्धा यावर्षी दिवाळी साजरी करतोय
पूर्वी कानठळ्या देणारे आवाज असत फक्त फटाक्यांचे
पण आज गडगडाट करत घुमणारा ढगांचा ढोल घुमे नभात
पूर्वी घरासमोर उंच लावलेला कागदी कंदील म्हणजे घराची शान
आज हा कंदील भिजू नये म्हणून आत आणावा लागला
पूर्वी दिवाळी म्हटली कि नाते जपणे आणि आल्या भेट- गाठी
आणि आज तर मनाने अन पावसानेही व्यस्त झालीत नाती
खरंच पाऊस हवाहवासा वाटतो खरा
पण इतकाही नको कि तो नकोसा व्हावा
आधीच सणांतली पूर्वीची अर्धी मजा आयुष्यात कमी झाली
त्यात पावसाच्या नव्या वर्दीने दिवाळीसुद्धा थोडी अडखळली.


तरी माझ्यातर्फे सर्वानाच पावसाळी दिवाळीच्या रिमझिम शुभेच्छा. 
हि दिवाळीसुद्धा तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या आयुष्यात सुखाच्या गारव्यासंगे आनंदसरी घेऊन येईल अशी शुभेच्छा.


- रुपाली ठोंबरे.

Wednesday, October 11, 2017

शुभेच्छांचे इंद्रधनू


आज पुन्हा नव्याने तुझ्या आयुष्यात 
सुखाच्या वाऱ्यासंगे श्रावण सुरु झाला 


आज दिवसभर मेसेजरुपी कितीतरी विजांनी 
तुझ्या मोबाईलचे आभाळ लख्ख भरून जाईल 
मधूनच एखादी मेघगर्जना करत कॉल येईल 
आणि मग पडेल शुभेच्छांचा पाऊसच पाऊस 

त्या आनंद देणाऱ्या शुभेच्छा-सरींमध्ये बघ
माझीही एक कवितेची सर आली असेल धावून 
हळुवार झेलून घे तिलाही तुझ्या सुख-क्षणांत 
आणि बहरू दे या जीवनाचा बगीचा पुन्हा नव्याने 

देवाच्याही सरी मागते तुझ्यासाठी मी प्रार्थनेत 
बरसू दे त्याही घेऊन आशीर्वादाच्या गार गारा 
सोनसळे मायेचे ऊन आणि प्रेमाचे गोड झरे 
येऊ दे जीवनी इंद्रधनू स्वप्नांचे घेऊन रंग सारे


-रुपाली ठोंबरे .




Blogs I follow :