Wednesday, December 27, 2017

Best Teacher


मनाशी एक धैर्य जोपासले 
त्या दिशेने प्रयत्नही केले 
त्यासाठी दिवस-रात्र एक केले 
मनापासून परिश्रम घेतले 
बुद्धीने ,शक्तीने सारे करून पाहिले 
पण तरी होता होता काहीतरी राहिले 
पूर्णत्वास जाणारे कार्य मध्येच अडखळले
चुकूनच एक चूक झाल्याचे कळून चुकले 
जिंकता जिंकता नकळतच हरले 
त्या हरण्याने मात्र नव्याने उठवले 
त्या चुकीलाही मानून गुरु मैदानी आले
पुन्हा नव्याने मनाशी एक धैर्य जोपासले
त्या दिशेने भरपूर प्रयत्नही केले 
ते ते सर्व केले जे होते मागे केलेले 
पण यावेळी यश हासत हाती आले
कारण 
यावेळी सोबत होती एका नव्या गुरुच्या मार्गदर्शनाची
साथ होती मागे केलेल्या चुकीच्या जाणिवेची
जिद्द होती त्या चुकीला सुधारून बदल घडवण्याची


- रुपाली ठोंबरे

Tuesday, December 19, 2017

गाणी आणि आठवणी

 कसे असते ना ... कधीकधी एखादे ओळखीचे गाणे कानांवर पडते आणि मग त्या गाण्यासोबत कुठेतरी जोडलेली आठवणींची तार अचानक मनावर आपले जाळे विणू लागते आणि मग आपले मन अगदी देह भान हरपून आधी त्या गाण्याच्या आणि नंतर त्यासोबत जुळलेल्या आठवणींच्या अधीन होऊन जाते.  न राहवून अचानक मूड का बदलतो याचे एखादे ओळखीचे पण विशिष्ट गाणे ऐकले हे देखील एक कारण असते असे मी म्हटले तर चकित व्हाल ना? पण माझ्यासोबत तर असे पुष्कळ वेळा होते.अनेकदा गाडीतून जात असताना ,बाजारात चालत असताना किंवा इतर कुठेही वाजणारे एखादे गाणे असे एक हरवलेले तराणे नव्याने वर्तमानात आणण्यास कारणीभूत ठरते आणि पुढे कित्येक वेळ ते या ओठांवरती गुणगुणत राहते...सोबत असते एखादी कुठेतरी दाट वनात गुंजारव करणारी पण आता अचानक स्मरलेली एक आठवण.

त्यादिवशी मुलाच्या नर्सरी सॉन्ग्स च्या लिस्ट मध्ये सुरु असलेले लहानपणीचे 'chubby chicks ... ' ऐकले आणि डोळ्यांसमोर लहानपणची छान हातवारे करत बोबड्या बोलांत कविता म्हणणारी मला मीच आठवली. मराठी माध्यमात असल्याने या इंग्लिश कविता फार कमी कानावर पडायच्या. त्यावेळी गट्टी असायची ती बालगीते आणि बडबडगीतांशी. आजही 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला... ', 'ससा रे ससा... ' किंवा ' नाच रे मोरा ... ' ऐकले कि त्या बालगीतांवर नकळत पाय थिरकतात.' ये रे ये रे पावसा... ',लहान माझी बाहुली... ','अटक मटक...' यासारखी बडबडगीते विचित्र हातवारे करण्यास भाग पाडतात.

 माझ्या लहानपणी आमच्या समोरच्या हॉटेलमध्ये सकाळ झाली कि त्या काळची हिट गाणी सुरु व्हायची. तो नव्वदीचा काळ. मैने प्यार किया , साजन , सडक , विश्वात्मा आणि असे कितीतरी त्या काळचे गाजलेले चित्रपट. त्यामुळे आजही कधी कानांवर ' कबुतर जा जा ... ', सात समुंदर पार करके' किंवा ' तुझे अपना बनानेकी कसम... ' या गीतांची धून कानी पडली तरी डोळ्यांसमोर २० वर्षांपूर्वीचे आमचे ते घर आणि त्या समोरचे  त्या काळचे ते आलिशान हॉटेल अगदी जसेच्या तसे उभे राहते. मी दुसरीला असताना आमच्या शेजारी एक मस्त एकत्र कुटुंब राहत होते. त्यांच्याकडे एकदा काही कार्यक्रम होता तेव्हा त्या तरुणांनी ' ही चाल तूरु तुरु, तुझे केस भुरुभुरु... ' इतक्यांदा वाजवले कि हे गाणे म्हणजे माझ्या मनात निर्माण झालेला त्या कुटुंबाच्या आठवणींसाठीचा एक दरवाजाच. आमच्या लहानपणी गणपती म्हटले कि फार मज्जा असायची. त्यावेळी फिरायला जाणे म्हणजे फार मोठे अप्रूप. सायन मधल्या पप्पांच्या एका मित्राकडे आमचा गणपती खूप थाटामाटात साजरा होई. त्या कोळी कुटुंबात आणि सार्वजनिक गणपतीत वाजणारी गणेशगीते आजही गणपतीच्या दिवसांत सायनच्या त्या कोळीवाडयाची सैर करवतात. ''डोल डोलताय वाऱ्यावर... ', ' आम्ही कोली ... ' अशा कोळीगाण्यांवर आमच्या पिढीतल्या प्रत्येकानेच एकदा तरी नृत्य सादर केलेच असेल. 'शेपटीवाल्या प्राण्यांची... ' हे मला माझे पहिले बक्षीस मिळवून देणारे गाणे. त्यामुळे अशी गाणी ऐकली कि मन आपोआपच बाललीलांशी मेळ घालायला सुरुवात करते.आणि आजच्या जगात राहून त्या बालवयात जाण्याचे अजब धाडस ही त्या काळची गाणी करतात.

काही गाणी एखाद्या घटनेशी निगडित असतात तर काही विशिष्ट व्यक्तींशी. प्रत्येकाच्या जीवनातले पहिले गीत असते आईच्या आवाजातले अंगाईगीत. आणि या अंगाईगीताशी आपसूकच आईच्या प्रेमाची नाळ जोडली जाते. 'चांदोबा चांदोबा भागलास का ?' हे सर्वांचे आवडते अंगाई गीत. पण मला कधी माझ्या आईने हे ऐकवलेलं आठवत नाही. पण मला आई आठवते ती बाबांनी लहानपणी माझ्यासाठी घरीच रेकॉर्ड केलेल्या आईच्या आवाजातील बडबडगीतांच्या कॅसेटमुळे. पुढे शाळेत शिकवलेले ' आईसारखे दैवत साऱ्या... ' हे गीत म्हणताना आणि आजही ते ऐकताना आई जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी तीच नजरेसमोर येते. पुढे ' तू निरागस चंद्रमा... ' किंवा बाली ब्रम्हभट्टचे ' तेरे बिन जिना नहीं ...' यासारखी कधीकाळी कोणी डेडिकेटेड केलेली गाणी असो किंवा ' तेरा होने लगा हू... ','मेरी दुनिया है तुझमें कहीं...' सारखी प्रेमगीते आणि ' तू जाने ना... ' सारखे विरहगीत सारेच कोणत्यातरी प्रिय नात्याची आठवण करून देणारी. अशी ही गाणी माणसामाणसांशी असलेले एक विशिष्ट नाते स्वतःच मनात निर्माण करतात ज्यामुळे या गीतांशी आपले असे एक अतूट नटे निर्माण होते. 

पिकनिक आणि गाणी हे समीकरण जसे ठरलेले तसेच त्या गाण्यांशी जुळलेल्या त्या त्या पिकनिकच्या आठवणी हे माझ्या आयुष्यातील एक समीकरण. नववीला आमची पिकनिक गेली होती तेव्हा आमच्या बस ड्रायव्हरच्या मनावर 'दिल तो पागल है' चित्रपटाची गाणी राज्य करत असायच्या त्यामुळे आजही कुठे जरी ' अरे रे अरे वो क्या हुआ ' ऐकले कि त्या पिकनिकमधल्या गंमतीजंमतींसोबतच पुढचा अर्धा तास तरी खर्ची होतो. पिकनिकप्रमाणेच बऱ्याच कार्यक्रमांशी निगडित काही गाणी असतात आणि त्या गाण्यांशी जुळलेल्या काही आठवणी. हल्ली लग्नाच्या विडिओ कॅसेट मध्ये सुंदर गाणी असतात आणि मग पुढे त्या गाण्यांशी तो प्रेमाचा धागा नकळत जुळला जातो. 

खरेतर माझ्या घरी अगदीच कलात्मक असे वातावरण अजिबात नव्हते. लहानपणी कॅसेट आणि रेडिओ यांवर वाजणारी गाणी हाच एक गाण्याशी जवळचा संबंध. तेव्हा ' घन क्रमी शुक्र... ',' श्रावणात घननीळा ... ',' रामा रघुनंदना .. ' अशी भक्तिगीते आणि भावगीते बऱ्यापैकी ऐकिवात होती. पण पुढे अभ्यास आणि टीव्हीवरची हिंदी दुनिया या पसाऱ्यात मराठी गाण्यांसोबत एक वेगळाच दुरावा निर्माण झाला. ती नाळ पुन्हा एकदा नव्याने जुळली ती आशा दीदींच्या आवाजातील ' केव्हा तरी पहाटे... ' या गीतामुळे आणि तेही इंजिनीरिंगच्या चौथ्या वर्षात. आमचा एक मंदार नावाचा मित्र होता. अगदी अफलातून गायचा. त्याच्या आवाजाची मीही एक चाहती होती. तर एकदा असेच कॉलेजनंतर बोलत असताना संगीताचा विषय निघाला आणि तो पुढे 'केव्हा तरी पहाटे ..' या गीतापाशी येऊन थांबला. मी एवढ्या कलाप्रेमींसोबत राहत असूनही माझे गाण्यांचे ज्ञान फारच तुटपुंजे होते. तेव्हा 'हे कोणते गाणे ?' या प्रश्नाचे उत्तर म्हणून मला मराठी गाण्यांची एक CD मिळाली आणि त्या दिवसापासून इतक्या वर्षांपासूनची ती तुटलेली तार पुन्हा एकदा जुळून आली. आणि मग अरुण दाते , सौमित्र ,लता आणि आशा दीदी या सर्वांचा सहवास अतिप्रिय वाटू लागला. संदीप खरेंच्या कवितांसोबत मराठी गाण्यांविषयीचे माझे प्रेम अधिकाधिक दाट होत गेले. या सर्व गीतांचा आणि कॉलेजमधल्या त्या एका भेटीच्या आठवणींचा एक सुंदर पर्वचा आयुष्यात कित्येकदा मनातल्या पडद्यावर उमटून पुसट होत जातो. 

तर अशी ही आठवणी ताज्या करून देणारी गाणी आणि अशा अनेक प्रिय गाण्यांना एका सुंदर बंधनात मनात गुंफून वर्षानुवर्षे रुजलेल्या आठवणी.  हा माझ्या आयुष्याचा अनमोल असा खजिना आहे जो वेळेनुरूप आयुष्यात एक वेगळीच बहर घेऊन येत असतो. आयुष्यात अशी कितीतरी गाणी आहेत ... प्रत्येकाचे स्वतःचेच असे अर्थपूर्ण शब्द , वेगळीच अशी चाल , लय आणि सूरही वेगळाच आणि त्यामुळेच प्रत्येक गाणे असे इतरांपेक्षा आगळे बनते आणि त्यासोबत जुळलेली आठवण देखील अद्वितीय बनते. आज बालपणापासून ते आजपर्यंतची विविध गाणी हा लेख लिहिताना आठवली आणि त्यासोबतच मनात दाटून आला एक वेगळाच आठवणींचा पूर ... विविध भावनांच्या असंख्य सुरांनी भरून निघालेला, वर्षांवर्षांच्या लहानमोठया घटनांना, व्यक्तींना पुन्हा एकदा नजरेसमोर आणणारा , आनंदाच्या असंख्य प्रवाहांना वाट मोकळी करून देणारा. 

- रुपाली ठोंबरे.




 

Wednesday, December 13, 2017

औपचारिक प्रेम

प्रेम... म्हणतात कि देवाने निर्माण केलेली प्रेम ही जगातली एक खूप सुंदर भावना आहे. प्रेमामुळे हे होते, प्रेमामुळे ते होते असे अनेक प्रेमाचे गोड किस्से नेहमीच ऐकिवात असतात. पण प्रेम ही जरी मुख्य संकल्पना असेल तरी जिथे समजूतदारपणा आणि विश्वास या दोन गोष्टींचा अभाव तिथे हेच प्रेम विषारी सिद्ध होते.आणि त्यामुळे उठणारा दाह हा अत्यंत असह्य असतो.

इथे प्रेम म्हणजे फक्तच एक मुलगा आणि मुलगी यांमधील भावनेचा उल्लेख नसून सर्वच नात्यांमधील प्रेमाला संबोधन करावेसे वाटते. आई- मुलं, मावशी, काका-काकू ,बहीण-भावी, सासू-सून, मित्र-मैत्रिणी अशी कितीतरी नाती या समाजात राहताना अगदी सहज आपल्या भोवताली आणि स्वतःत सुद्धा जन्म घेतात. दोन जीवांमधील एक अचानक निर्माण झालेली आपुलकीची भावना म्हणजे प्रेम. तिथे एकमेकांविषयी काळजी वाटणं , अभिमान वाटणं , राग येणं या अगदी सर्रास घडणाऱ्या कृती. कुणावरही हे प्रेम कधीच ठरवून केले जात नाही किंवा जबरदस्तीने करवून घेतलेही जात नाही. आणि जिथे या दोन गोष्टी घडल्या तिथे प्रेम या शब्दाच्या मूळ अर्थालाच तडा गेलेला आढळतो.त्याचप्रमाणे प्रेम ही जर क्षणाक्षणांच्या लहानमोठ्या घटनांनी घडत जाणारी एक उत्तुंग सुंदर इमारत असेल तर समजूतदारपणा आणि विश्वास हे त्या इमारतीच्या पायाचे मूळ स्रोत. जर हा पायाच भक्कम नसेल किंवा काही काळाने त्याला तडा गेली तर ती अतिशय आनंदाने बांधलेली प्रेमाची इमारत ढासळण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो.आणि मग जीवनाच्या नंदनवनात घडलेला हा एक धरणीकंप संपूर्ण जीवन हादरवून टाकतो. 

एखादी नवी नवरी आपली सर्व नाती, स्वप्ने मागे सोडून एका नव्या कुटुंबासाठी सासरच्या घरात पाऊल ठेवते. सुरुवातीला सारेच अनोळखी. हळूहळू त्या औपचारिक नात्यांत मायेचा ओलावा निर्माण होऊ लागतो. आणि प्रेमाचा एक गोड पाझर त्या नववधूच्या जीवनात झिरपू लागतो. या हक्काच्या प्रेमातूनच मग हळुवार नकळतच अपेक्षांची कक्षा रुंदावली जाते. या सर्व नव्या नात्यांत ती नवी स्वप्ने पाहू लागते. त्यांना आपलेसे करू पाहते. आनंदाच्या कारंज्यात प्रत्येक दिवशी न्हात असताना अचानक काहीतरी महत्त्वाचे अचानकच तिच्या हातून हरवून जाते. त्या हरवलेल्या गोष्टीमुळे ती कष्टी असतेच पण तरी त्यावेळी ती तात्काळ डळमळत नाही. कारण... कारण तिच्या सोबत प्रेम असते जे इथे आल्यानंतर तिच्या शिदोरीचा एक भाग बनलेले असते. या ठिकाणी हे प्रेम म्हणजे एक खूप मोठा मानसिक आधार असतो. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू आमचीच आहेस अशा कितीतरी बोलांनी त्या परिस्थितीतही तो जीव धैर्याने उभा असतो. पण जेव्हा हळूहळू या प्रेमाच्या खोल गर्तेत दडलेल्या स्वार्थीपणाचा ,नुसत्या दिखावूपणाचा , अविश्वासाचा आभास होऊ लागतो तेव्हा मात्र त्या जीवनात खरा भूकंप निर्माण होतो आणि त्यातून पुन्हा उभे राहणे म्हणजे एक नवी सत्वपरीक्षाच. आपले म्हणणारे, आपली काळजी करणारे , आपल्यावर प्रेम करणारे आपल्याला साधे समजूनही घेऊ शकत नाहीत ही एक भावनाच एका कंटकाप्रमाणे मनात सलत राहते. अंधारात चाचपडत असताना अगदी लगेच बाहेर काढण्याचीच गरज असते असे नाही. एखादा विश्वासाचा , प्रेमाचा एक खरा बोल हा देखील जीवनातील पुढचा श्वास घेण्यासाठी पुरेसा असतो. त्या अंधाराला कायमचा नष्ट करणारा प्रकाशमान करणारा दिवा लावणारा मोठ्या मनाचा कुणी आयुष्यात असणं म्हणजे तर खूप थोर भाग्य. पण असो. अशी खरी नाती फार कमी जणांच्या जीवनात येतात. त्यामुळे खरे प्रेम आणि त्यामागची भावना लक्षात घेऊनच विश्वास ठेवणे आणि पुढे अपेक्षा करणे या पायऱ्यांना जीवनात स्थान देणे योग्य. नाहीतर आधी उपेक्षा आणि मग विरोध दर्शवताच होणारा अपमान याशिवाय त्या निरागस जीवाच्या पदरात इतर काहीदेखील पडत नाही. क्षणाक्षणाला जाणवणाऱ्या या मानसिक दडपणामुळे जीव कणकण तुटत राहतो...आतल्या आतच रडत राहतो ज्याचा हुंदकाही कुणाला ऐकू येत नाही किंवा तोपर्यंत सर्वानी आपले डोळे झाकून आणि त्यांच्या कानांत बोटे असतात . आणि मग कित्येक वर्षांपासून उभारलेली ती सुंदर इमारत कोलमडून जमीनदोस्त केव्हा होऊन गेली हे त्या दोघांनाही कळत नाही. 

हे एवढे वाचल्यावर मी अगदीच प्रेमाच्या विरोधात आहे वैगरे असा गैरसमज नक्कीच व्हायला नको. ' प्रेम ही या जगातील सर्वात सुंदर आणि अनमोल देण आहे' यावर मी अजूनही ठाम आहे. फक्त नुसतेच प्रेम काही कामाचे नाही , त्याचा पाया जो विश्वासाने बनला आहे तो आधी पडताळून पाहायला हवा, त्यात तात्पुरता दिखाऊपणा तर नाही ना हे शोधून पाहावे म्हणजे मग ते प्रेम जीवन फुलवणारे एक पुष्प सिद्ध होईल.कारण या जगात खरे पाहिले तर कोणालाही कोणासाठीही वेळ नसतो किंवा तो द्यावासही वाटत नाही. पण अशा नकली प्रेमाचा देखावा करण्याचे साहस मात्र प्रत्येकजण अगदी आनंदाने पार पाडत असतो. त्यात मग असा नियतीमुळे एकटा पडलेला , आधार शोधणारा वेडा जीव उगाच या औपचारिक नात्यांमध्ये बळी पडतो, रुसतो , रागावतो, दुःखी होतो ते सर्व काही करतो ज्यावर त्याचा हक्कच नसतो. आणि मग एकदा असा काही भावनांचा स्फोट होतो ज्यात सर्व जळून खाक होते. त्यामुळे वेळीच खरे प्रेम ओळखून त्यास साथ द्या नाहीतर स्वतःलाच ओळखून एकट्यानेच आयुष्य आनंदाने जगा. 

- रुपाली ठोंबरे.

Friday, December 8, 2017

Happy Birthday !!!



Now a days, I miss those beautiful eyes around me
The eyes...which gets filled with emotions
for my every little wanted- unwanted story.
 
Now a days, I miss that beautiful smile around me
The laughter... which gets bigger and bigger
with every mischievous story of my little one.

Now a days, I miss those beautiful words around me
The words...inspirational, caring, motivating ones
which comes after every chat we had together. 

Now a days, I miss that simplicity around me
a rare nature...with all beautiful qualities 
which is blended with the highest power of understanding.

Now a days, I miss those appreciation around me
The appreciation...for my every little creation
which is a loveliest fuel of my life's engine.

Now a days, I miss that little girl around me
A sweet girl...whom I can call my best friend
and wish a bunch of good wishes for her everyday.
 

Happy Birthday, Ritu !!! 
May God bless you with showers of success and happiness.
Enjoy

- Rupali.

Tuesday, December 5, 2017

सहल छत्रीची

" अरे अरे अरे हो हो जरा हळू ...पण छे ! आपले ऐकणार ती ही माणसे कसली ?
सकाळपासून इथे काय सुरु आहे कोण जाणे ! सारखे इकडच्या गोष्टी उचलून तिथे टाक आणि तिथल्या इथे. माझा सभोवताल पूर्णपणे अस्ताव्यस्त करून टाकला होता या मुलीने . एवढे काय विशेष शोधत होती कधीपासून कपाटात देव जाणे ! असा विचार मी करत असतानाच चांगले खेचूनच मला बाहेर काढले हिने. तिने एकदाचे हुश्श केले पण मी मात्र बाहेर पडताच आ वासला. डिसेम्बर महिना सुरु आहे चांगला थंडीचा , हवेत बऱ्यापैकी गारवाही जाणवतोय, या काळात खरे पहिले तर ना पाऊस असतो ना ऊन ... मग हिला कशी बरे माझी म्हणजे छत्रीची इतकी आठवण झाली असेल. इतके जोरात ओढले मला कि त्या हिसक्याने अंगच दुखायला लागले. मला उघडून , फिरवून वैगरे पाहून झाले आणि पुन्हा काही विचार करत ती कपाटात शोधाशोध करू लागली. मला तर काही उमजेच ना ! काय सुरु आहे हिचे ते. मग पुन्हा एक हिसका देत ओढतच तिने एक गुलाबी रेनकोट बाहेर काढला. गुदमरलेल्या अवस्थेत तो बिचारा कपाटात एका कोपऱ्यात निपचित पडून होता. त्यालाही तिने चांगलेच जागे केले. माझ्यासारखाच तो देखील बाहेर आला तो चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊनच. आम्ही दोघे कधी एकमेकांकडे तर कधी खोलीत इतस्ततः पाहत उभे होतो. टापटीप खोलीत सगळीकडे दिसत होते ते रंगीत स्वेटर्स , उबदार शाली आणि  गोधड्या... हे सर्व असताना आमचे इथे काय काम? हा आम्हा दोघांनाही प्रश्न. खरंच सांगते त्या सर्वांच्यात आम्ही खूप निराळे वाटत होतो. पण आम्ही काही भावना व्यक्त करणार इतक्यात पुढच्याच क्षणी तो या मुलीच्या बॅगेत कोंबला गेला आणि मी तिच्या मुठीत.
" आई मी येते गं "
म्हणत ती घराबाहेर पडली. आणि सोबत मीही हिवाळ्याच्या सुट्टीची मज्जा अनुभवण्यासाठी बाहेरच्या दिशेला वळली. पण कसला हिवाळा न कसली सुट्टी! एव्हाना सकाळचे ८.३० झाले होते पण आकाशात सूर्याचा मागमूसही दिसत नव्हता. पहाटे ५ वाजेचे गार वातावरण दिवसाच्या नको त्या वेळी सर्वत्र जाणवत होते. धुक्यामुळे सर्वच अगदी धूसर... आणि हे काय या अशा धुक्यात चक्क पाऊस. तेच थेंब ... त्याच धारा. आत्ता समजले का आपले असे परत इतक्या लवकर स्वागत झाले ते. आता माझा तिच्यावरचा राग बऱ्यापैकी निवळला पण पावसावर खूप रागावले मी खरेच. चांगली आराम करत होते ना मी ! उगाच हा मध्येच असा कसा येऊ शकतो बरे... स्वतःही असा ना सांगता आला आणि आम्हालाही कामाला लावले. पण आपले परमकर्तव्य लक्षात घेऊन मी तो राग दूर केला. आणि आभाळातुन कोसळणारे गार थेंब जसे अंगावर जाणवले तसे मी लगबगीने पुढे आले. आपला लाल पोपटी रंग दिमाखात मिरवत मी ऐटीत माझ्या मालकिणीच्या डोक्यावर स्थानापन्न झाली. कोंदटलेले सारे श्वास आता मोकळे झालेसे वाटले. इतक्या लवकर अशी अंघोळ पुन्हा मिळेल असे वाटले नव्हते पण या वर्षी ही देखील जादूच. मी जरा वाकून माझ्या बाईसाहेबांच्या कानात पुटपुटले,
" आता ना मान्सून ना पावसाळ्याचे आसपासचे दिवस. मग हा पाऊस कसला?"
यावर ती लगेच उद्गारली ,
" हा पाऊस 'ओखी' वादळाचा."
'वादळ ?'...बापरे ! मला वादळाची तर खूप भीती वाटते. मागच्या वेळी जराश्या हवेत सुद्धा मी पार उलटी होऊन गेली होती. आणि खूप हाल होतात मग माझे. कधी कधी हाडे खिळखिळी होतात तर कधी एखादे फ्रॅक्चर... त्यात यांना वेळ मिळाला तर थोडे उपचार तरी होतात नाहीतर असतेच मी तसेही सोसत.तशी मी शरीराने नाजूकच, पण हे वर्षानुवर्षे इतके उन्हाळे- पावसाळे झेलून फारच सोशिक बनलेय मी.बरे झालेय बाबा, या बयेने रेनकोटदादालाही सोबत घेतले आहे ते. म्हणजे ऐन वेळी माझ्या मालकिणीचे हाल नकोत व्हायला. तशी मागच्या अनुभवानंतर तीही चांगलीच सतर्क झालेली दिसतेय. ते काही असो... पण या ओखीच्या निमित्ताने या वर्षी आमची लवकर ही अशी मनासारखी आंघोळ झाली ते विशेष.एखाद्या सुट्टीच्या दिवसांत नव्या ऋतूच्या देशात मस्त सहल होते आहे असा फील येतोय मला तर... त्या ओखीच्या वादळाचीच कमाल आणखी काय .

पण अरे पावसा , असे सारखे सारखे पावसाळे नको रे दाखवूस. कन्फ्युज व्हायला होते मलापण. अजून खूप वर्षे जगायचे आहे मला.त्यासाठी योग्य झोप हवी ना ! तेव्हा वर्षावर्षाला ये पण तुझ्या वेळीच. आता जरा आराम करू दे मला. "


- तुमचीच प्रिय विश्वासू ,
  एक छत्री. 

- रुपाली ठोंबरे .

Monday, December 4, 2017

बालमैफल -१

बालमैफल -१
 माझी लोकसत्ता मध्ये आलेली पहिली कथा.


वाचण्यासाठी लिंक :
एका चित्राची गोष्ट
 

Friday, December 1, 2017

मला भावलेली झी मराठी वरील मालिका


"श्वास तू ध्यास तू , मैत्रीतील बंध तू..... झी मराठी ,मी मराठी "

म्हणत घराघरात पोहोचलेली 'झी वाहिनी' आज अख्या महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या घराघरांतून डोकावतेय . आज खरेतर ढीगभर प्रसारवाहिन्या आणि त्यावर सुरु असलेल्या शेकडो मालिकांचे जाळे दूरचित्रवाणीवर जरी पसरलेले असले तरी अनेक मध्यमवर्गीय मराठी ज्ञात कुटूंबामध्ये हमखास आवडीने पाहिली जाणारी वाहिनी आहे - 'झी मराठी'. आमचे घरही याला अपवाद नाही, बरे का ? माझे लग्न झाले, सासरी आले आणि सासरच्या नव्या नात्यांसोबतच एक नवे नाते जीवनात निर्माण झाले ते झी मराठी सोबत, कारण इथे सर्वांचीच ती अतिशय प्रिय. 'दिल्या घरी तू सुखी रहा' ,'होणार सून मी त्या घराची', 'अस्मिता' , 'राधा ही बावरी' ,'जय मल्हार' यांसारख्या जुन्या मालिका असोत वा आता सध्या सुरु असलेल्या 'काहे दिया परदेस','लागिरं झालं जी' , ''तुझ्यात जीव रंगला ' यांसारख्या नव्या मालिका असोत, या सर्वच दर्शकांवर त्यांची छाप पाडण्यात यशस्वी झाल्या आहेत. आमच्या घरी तर रोज संध्याकाळी ६.३० वाजता 'दार उघड बये , दार उघड ' म्हणत झी मराठी आमच्या दूरचित्रवाणीवर अवतरते ते रात्री ११ वाजता 'जागो मोहन प्यारे ' म्हणत ती निरोप घेते.

झी मराठी वरची प्रत्येक मालिकाच जरी खूप सुंदर असली तरी मला त्यामध्ये भावलेली मालिका म्हणजे - 'माझ्या नवऱ्याची बायको '. सुरुवातीला या अजब शीर्षकामुळे या मालिकेबद्दल एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती आणि त्यामुळेच अगदी पहिल्या भागापासून पाहिलेल्या मालिकांच्या सूचीमध्ये तिचा समावेश झाला. एक्स्ट्रा मॅरिटेल अफेअर हा सध्याच्या समाजातील एक गंभीर तितकाच नाजूक प्रश्न ज्या सहजपणे आणि कल्पकतेने यात मांडला आहे ते खरेच वाखाणण्याजोगे. चित्रपटसृष्टी असो वा मालिका... हा विषय दर्शकांसाठी निश्चितच नवा नाही पण तरी याच विषयाला घेऊन एक वर्षांपूर्वी दर्शकांसमोर आलेल्या या मालिकेने सर्वांच्या मनात घर केले  ते तिच्या अप्रतिम मांडणीमुळे आणि मालिकेतील कलाकारांच्या समर्पक अभिनयामुळे.यात कुठेही अति भडकपणा नाही किंवा रेंगाळत एकाच जागी थांबलेले नकोसे वाटणारे प्रसंग नाहीत. सुरु झाल्यापासून ती संथपणे वाहतेच आहे एका नदीप्रमाणे...आपल्यातील गुणांनी दर्शकांना तृप्त करत. आणि जसजसे कथानक फुलत गेले ते अधिकाधिक सुंदर होत गेले यात शंकाच नाही.

खरेतर 'माझिया प्रिंयाला प्रीत कळेना ' नंतर अभिजीत खांडकेकरला या अशा भूमिकेत पाहणे म्हणजे जरा जीवावरच आले होते . पण इथेही त्याने आपल्या भूमिकेला अचूक न्याय दिला आहे.पत्नी सोडून इतर प्रेमप्रकरण यासारखे चुकीचे काम करायचेही आहे आणि ते करण्यासाठी सुरु असलेला गुरूचा आटापिटा ,पुढे नंतर प्रत्येक वेळी कुठेतरी अडखळून तोंडघाशी पडायचे अन नको तो मनस्ताप डोक्याला लावून घ्या ... पण तरी कुत्र्याच्या शेपटासारखे सरळ न होणारी माणसाची अशी एक जात त्याने आपल्या अभिनयातुन अतिशय प्रबळतेने समोर सादर केली आहे. अशावेळी अशा या गुरूचा राग येत असला तरी कित्येकदा त्याची कीवच येते. यातले एक आणखी मजेदार पात्र म्हणजे शनया. खरेतर शनया हे या मालिकेतील एकमेव खलनायिकेचे पात्र पण इतर खलनायिकांप्रमाणे हिचा कायम राग राग होतच नाही उलट ती मजेशीर वाटते ते तिच्या प्रत्येक प्रसंगी होणाऱ्या फजितीमुळे.गॅरीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याइतकी शहाणी, काहीशी बालिश , आळशी आणि कायम इतरांच्या पैशांवर अवलंबून राहून स्वतः मौजमस्ती करू पाहणारी ही  स्वार्थी प्रेयसी, रसिकाने अतिशय सुंदरतेने साकारली आहे. राधिका हे या मालिकेतील महत्त्वाचे पात्र आहे म्हणूनच नव्हे तर ते पात्र मला अधिक भावते ते ती कित्येकजणींसाठी एक प्रेरणा ठरणारी व्यक्तिरेखा आहे म्हणून . अनिता दातेने साकार केलेली राधिका... एक अतिशय सुंदर ,साधी , सरळ पतिव्रता गृहिणी... घराच्या पसाऱ्यात स्वतःचे अस्तित्व शोधून ते मानणारी, कायम जवळच्यांच्याच नव्हे तर अगदी परक्यांच्याही मदतीला धावून जाणारी, नवऱ्याचे बाहेर सुरु असलेले प्रेमप्रकरण समजल्यावर भावुक होणारी पण तरीही नुसती हार मानून रडत बसण्यापेक्षा त्यातून नवा मार्ग शोधणारी, या शनयारुपी आलेल्या वादळाला अगदी हुशारीने आणि धैर्याने सामोरी जाणारी, परिस्थितीमुळे हतबल होण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करू पाहणारी... एक भविष्यातली उद्योजिका जी आज पुणे मुंबईच नव्हे तर अगदी सिंगापूरपर्यंत एकटी जाऊ शकणारी. ती व्यक्तिरेखा पाहून खूप काही शिकावेसे वाटते. 'एखाद्या स्त्रीने मनात आणले तर ती सर्व काही करू शकते' हा मंत्र या मालिकेतून नक्कीच घेण्यासारखा आहे.

 'माझ्या नवऱ्याची बायको' हे कथानक प्रामुख्याने जरी या ३ व्यक्तिरेखांभोवती फिरत असले तरी त्यातील प्रत्येक प्रसंग जिवंत होतो तो या मालिकेतील इतर पात्रांमुळे मग ते राधिकाच्या मदतीला धावून येणारे आई-बाबा,आनंद ,जेनी असो ,सोसायटी मधले नाना-नानी  ,रेवती असो वा शनायाचे स्वार्थी मित्र. एकूण पाहता एक अतिशय गंभीर, एखाद्याच्या आयुष्यात वादळ घेऊन येणारा प्रश्न आणि त्यावरची उत्तरे अगदी हलक्या फुलक्या रीतीने प्रेक्षकांसमोर साकारल्याबद्दल या मालिकेचे दिग्दर्शक ,लेखक ,कलाकार अगदी सर्वांचेच मनापासून आभार मानावेसे वाटतात. आणि या यासोबतच या मालिकेच्या भवितव्यासाठी सर्वाना खूप खूप शुभेच्छा. शनया किंवा गुरुनाथ सुधारतील की नाही ते माहित नाही पण येणाऱ्या प्रत्येक प्रसंगातून राधिकाची नक्कीच प्रगती होत जाईल आणि तिच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच नवे काही शिकायला मिळत जाईल.

- रुपाली ठोंबरे. 


Wednesday, November 22, 2017

समिक्षा

लग्न करून नवी नवरी नव्या घरात येते. नव्या माणसांमध्ये स्वतःला मिसळू पाहते. तेव्हा विविध स्वभावाची आणि विविध प्रकारची नाती आणि त्यांच्यासोबत होणारा पहिला संवाद , पहिला सहवास हा एक कुतूहलाचा आणि विशेष भाग असतो... अगदी नव्याने त्या कुटुंबात प्रवेशलेल्या वधू साठी आणि तिचे आनंदाने स्वागत करणाऱ्या परिवार सदस्यांसाठीसुद्धा. या यजमान मंडळींमध्ये सर्वच वयाचे आणि विविध प्रकारचे सारेच जण सामील असतात. अगदी ८५ वर्षांचे आजोबा पण असतात आणि अगदी नुकतीच जन्मलेली एखादी परीदेखील. आणि अशा या कुटुंबात जेव्हा ही नववधू आतुरतेने प्रवेशते तेव्हा तिची नजर शोधत असते एखादी अशी मैत्रीण जिच्यासोबत ती अगदी मनमोकळेपणाने संवाद साधू शकते. मी फार भाग्यवान होते जिला अशा बऱ्याच मैत्रिणी सासरच्या गोतावळ्यात मिळाल्या. 

पण त्यातली सर्वात जवळची वाटणारी आणि जिच्यासोबत वेळ घालवायला, बोलायला कधीही आवडते ती म्हणजे या कुटुंबातल्या बच्चेकंपनीतली एक खास मैत्रीण. खरेतर प्रत्येक घरात ही बच्चेकंपनी म्हणजे नव्याने त्या घरात येणाऱ्यांसाठी सहज संवाद करण्यासाठी जागा निर्माण करणारी महत्त्वाची पिढी. यांच्याशी लगेच कोणीही मिसळून जातं आणि तेही अगदी सहज या नव्या पाहुण्याच्या रममाण होतात. 

अशीच एक नात्याने माझी पुतणी असणारी पण एका मैत्रिणीसारखी असणारी समीक्षा या जीवनात आहे. नाते काही जरी असले तरी मनापासून तिच्यामध्ये मी नेहमी एक छान मैत्रीणच पाहिली. कुटुंबातील कार्यक्रमांच्या निमित्ताने कधी कधी होणाऱ्या भेटी असोत किंवा एकत्र होणाऱ्या सहली...आम्ही कायम एकत्र. एक वेगळ्याच गप्पागोष्टी सुरु असायच्या आमच्यात. प्रत्येक गणपतीत सजावट करताना येणारी धमाल तर कधीच विसरता येणार नाही. मुंबई-पुणे असे दूरचे अंतर असले आणि आपापल्या काम-अभ्यासाच्या किती जरी गडबडी असल्या तरी व्हाट्सअँप वर का होईना पण कायम आम्ही सहवासात असतो. या बालमैफिलीच्या सहवासात आपणही बालविश्व् जगू लागतो ते खरोखर कितीदातरी अनुभवले. थोडीशी शांत , मनमिळावू , कधी खट्याळ , जितकी इतर गोष्टींत चपळ तितकीच अभ्यासात चाणाक्ष...अशी ही सखी म्हणजे एक समीक्षाच, एका नात्यातल्या सुंदरतेची. 

समिक्षा, जशी आहेस तशीच कायम हसत रहा, आनंदी राहा. दिवसामागून दिवस जात राहतील पण तू मात्र कणाकणाने का होईना पण कायम प्रगती करत राहा. कधी चुकून अपयश जरी पावली आले तरी अपयश ही यशाची पहिली पायरी असे समजून त्या क्षणांना सतर्कतेने ओलांडून तू नव्या आनंदात सहभागी हो. हरणे आणि रडणे याचा स्पर्श मात्र कधीही आसपास होऊ नये. कायम प्रयत्न करत राहा... उत्साहाने जगत राहा...फुटणाऱ्या इवल्याशा पंखांतील बळ एकवटून नव्या क्षितिजाशी झेप घे पण सतर्कतेने.. आणि मग बघ तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची जागा कशी त्यांच्या पूर्ततेने घेतली जाईल. पण या सर्वासाठी गरज आहे ती प्रयत्नांची, मोठ्यांच्या आशीर्वादाची आणि देवाच्या कृपेची. हा आशीर्वाद आणि प्रयत्न करण्याची शक्ती आणि बुद्धी तुला नेहमी आजन्म मिळत राहो हीच आजच्या सुदिनी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि भवितव्यातील पुढच्या अनेक टप्प्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. ही प्रार्थना आणि ही शुभेच्छा हीच तुझ्या वाढदिवसादिवशी तुला माझ्याकडून भेट. ही भेट सदा तुझ्या संगे नक्कीच राहील.

पुन्हा एकदा जन्मदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा !!!


- रुपाली ठोंबरे.

Monday, November 20, 2017

दव भिजले पावसात ...

या वर्षी पावसाळ्याचे स्वागत आणि पावसाची राहण्याची सोय चांगली जय्यत झाली असेल असे वाटते.यावर्षी पाऊस फारच आनंदला वाटते आमच्यावर. म्हणूनच कि काय हिवाळा आला तरी पावसाला काही  आपला निरोप घ्यावासाच वाटत नाही. आता एक-दोन महिन्यांपूर्वीचीच गोष्ट. पावसाळा संपून कित्ती तरी दिवस झाले होते तरी हा पाहुणा जाण्याचे नाव काही घेईना. अगदी कायम सोबत नसेल तरी दिवसातून त्याची एक फेरी हमखास होत असे.प्रत्येकाला पाऊस आवडतो हे जरी खरे असले तरी अगदी त्याचा त्रास होईपर्यंत बरसत राहावे हे मात्र मुळीच बरोबर नाही.एखाद्याला मधुमेह झाला कि साखर व्यर्जच होते.मग हा मधुमेह होईपर्यंत कशाला एवढे साखरेचे अतिक्रमण? पावसा, तुझेही हे असेच झालंय बघ. तू येतोस तेव्हा किती आनंद देतोस...ते सर्व आकाशात जमणारे काळे मेघ , वाहणारा सो सो वारा, आभाळातून बरसणारे हजारो मोती, मातीचा तो मृदगंध , फुटणारी नवी पालवी, वाहणारे निर्झर ... अगदी सर्वच हवेहवेसे वाटते. पण हा अनुभव काही काळासाठी आणि तुझ्या ऋतूतच स्वर्गमय वाटतो रे. सगळीकडे पाणी पाणी झाले कि एका काळानंतर ते नकोसे होते.आणि म्हणूनच तर निसर्गाने ऋतुचक्र निर्माण झाले आहे. पावसाळा झाला कि हिवाळा आणि हिवाळा झाला कि उन्हाळा आणि परत असेच हे जीवनचक्र सुरु. प्रत्येक ऋतूने नव्याने अतिथी येऊन यावे, चार महिने आनंदाने राहावे, आणि पुन्हा निरोप घेऊन जावे. दुसऱ्याच्या कारभारात मध्येच येऊन लुडबुड कशाला? प्रत्येकाची आपली अशी काहीतरी देण, ती त्या त्या ऋतूतच अनुभवण्यात खरे सुख.

पण पावसा, सांग ना ? तुला आता काय झाले आहे ? तुला जावेसेच वाटत नाही का इथून? इतके प्रेम असले तरी आता तू जा म्हणजे तुझे ते अप्रूप नेहमीच जीवाला वेड लावीत राहील. काही दिवसांपूर्वीचे ठीक होते. तेव्हा या हिवाळ्याने आपले पाय रोवले नव्हते अजून. पण आत्ता ? चांगली थंडी पडते आहे आता. पहाटेच चोरपावलांनी थंडी कुशीत शिरते ती दुपारपर्यंत दूर जायचे नाव घेत नाही. आणि संध्याकाळी सूर्याच्या निरोपासंगे त्याला घाबरून दडून बसलेली ही थंडी पुन्हा बिलगून बसते. पहाटेची गुलाबी थंड हवा , धुक्यात हरवणारी पाऊलवाट , पानापानांवर जमलेले दव मोती... हा सर्व हिवाळ्याचा नजराणाही आम्हा सर्वांना हवाहवासा असतो. या थंड गारव्यानंतर अंगावर येणारे सूर्यनारायणाचे कोवळे ऊन आणि त्यातून मिळणारी ऊब...अहाहा हे तर अतिशय अभूतपूर्व. प्रत्येक दिवशी मन आणि अंग या ऊन- गारव्याच्या भेटीनंतरच्या या मोहक स्पर्शासाठी आतुरलेले. आणि आता तूच सांग, अशाच प्रसंगी तू असा आजसारखा अनाहूत पाहुण्यासारखा अचानक तडमडलास तर कसे बरे चालेल ? त्या थंडीत जिथे ऊबदार गरम स्पर्शाची इच्छा तिथे असे गार गार पाण्याचे थेंब आकाशातून बरसू लागले तर... ? बरे तुझे स्वागत करावे पुन्हा नव्याने तर त्यासाठी आमच्याकडे छत्रीसुद्धा नसते. कारण तूच असा वर्दी न देता अचानक आलेला असतो. शुभ्र दाट धुक्याच्या चादरीसमोर तुझे काळे मेघपुंजके नेत्रांना नाही सुखावू शकत.दवबिंदूंनी ओलावल्या पाऊलवाटेवर अनवाणी चालताना मिळणारा आनंद तुझ्या पाण्याच्या तळ्यांनी विरून जातो कारण तुझ्या थेंबांच्या पसाऱ्यात जमलेले हे आता हवेहवेसे वाटणारे दव भिजून वाहून जातात. आणि मग असे झाले कि नकळत मनात तुझा राग येतो. तुझ्या या अशा कारभारामुळे मिळणाऱ्या आजारांच्या निमंत्रणांमुळे दोन शिव्याही पडतील बघ तुला. मग तूच दुखावशील, नाराज होशील आणि पावसाळ्यात येण्यासाठी पुन्हा तुझे नवे नाटक. अरे हो हो , माहित आहे. आम्हीच कुठेतरी कारणीभूत आहोत या असल्या गफलतींसाठी.पण आता ऐक. तू खुशाल जा तुझ्या घरी. तुझ्यासाठी खूप खूप झाडे लावू आम्ही. म्हणजे पुन्हा परत यायला तू तुझी वाट चुकणार नाही. आणि तुझी वेळही जाणार नाही. आता जास्त वेळ दवडू नकोस. उगाच हिवाळ्या-उन्हाळ्याच्या कार्यक्रमात हस्तक्षेप करू नकोस नाहीतर तेही रागावतील आणि तुझ्या ठरलेल्या वेळी तुला ते येऊ द्यायचे नाहीत. सर्वच चक्र बिघडून जायचे. 

पण काही म्हणा आज असा हिवाळ्यात न सांगता आलास खरा. ऑफिसला जाताना भिजवल्याने जरा रागही आला. पण तरी पावसावरचे माझे अतूट प्रेम काही केल्या तुझ्यावर रुसू देत नव्हते. आणि मग धुक्यातून वाट काढत भावनेच्या ओघात भिजलेल्या मनावर नकळत उमटलेल्या चार ओळी चिंब न्हाल्या...


 पाऊलवाट दवात ओलावलेली 
आज पुन्हा नव्याने भिजली
आठवण तुझ्यासवे रंगलेली 
आज पुन्हा नव्याने स्मरली

- रुपाली ठोंबरे.

Tuesday, October 31, 2017

एक तेजोमय तारा

कधी कधी आयुष्यात एका वळणावर अचानक एक विचित्र काळोख दाटलेला आढळतो. भविष्यातले पुढचे सोडाच अगदी जवळचे आसपासचेही काही दिसेनासे होते. आपलेच वाटणारे सर्व फार दूर जात एकाएकी धूसर होत जातात. कित्येक विश्वासांना एकाच क्षणी तडा गेलेला असतो. नशिबाच्या नावेवरती झोके घेत एका विचित्र वादळात हा जीव हेलकावे खात असतो. त्या क्षणी खूप भीती वाटते. जीव घाबराघुबरा होतो कारण अशा क्षणांत आपल्या वाईटाची वाट पाहणाऱ्या घुबडा-गिधाडांचे  किती तरी डोळे दूरवर दिसत असतात. नावेतून अचानक तोल गेला तर.... ? या मिट्ट काळोखात जीव गुदमरून गेला तर ...? अशा नाना प्रश्नांनी जीव त्रासून गेलेला असताना मग सुरु होतो परमेश्वराचा नामजप. कारण त्याशिवाय कोणताही उपाय दिसत नाही. देवा तू येऊन सर्व ठीक करावे अशी अपेक्षा त्या वेळी नक्कीच नसते तर अपेक्षा असते आपल्या प्रयत्नांना यश मिळण्याची...संकटात हिम्मत देणाऱ्या एका आशीर्वादाची. 

आणि मग अशा भयाण अंधारात चाचपडत असताना एक मिणमिणता तारा दृष्टीस पडतो. अरे हे काय ? हा तर माझ्याच दिशेने येत आहे. प्रखर होत आता तो दिव्य प्रकाश माझ्या अगदी जवळ आला. त्याच्या असंख्य तेजकणांनी हा जीव पुन्हा जिवंत झाला. काही काळापूर्वी वाटणारी भीती आता कुठच्या कुठे नष्ट झाली. वादळातही मन घट्ट झाले आणि आसपास वाहू लागले आनंदाचे गार वारे. अचानक एक वेगळाच विश्वास अंगी संचारला. गुदमरत असलेला जीव आता मुक्त झाला, त्याला स्वप्नांचे अनंत पंख फुटू लागले जे आकाशात झेप घेण्यास उत्सुक होते. आनंदाच्या भरतीच्या उधाणातही मन स्थिर ठेवण्याची बुद्धी निर्माण झाली. प्रयत्नांना यश किंवा अपयश आले तरी त्या विश्वासाचे कवच इतके कठीण होते कि हिम्मत जरा देखील ढळली नाही.उलट त्याच्या सतत मार्गदर्शनाने ती हिम्मत नेहमीच कणाकणाने वाढत राहिली. प्रत्येक पावलावर येणारे संकट आता एक नवे आव्हान वाटू लागले. त्याला स्वीकारण्याची आणि पूर्ण करण्याची एक दिव्य शक्ती त्या तेजस्वी दिव्याकडून मिळाली. या शक्तीच्या साहाय्याने कितीतरी दूर प्रयत्नपूर्वक चालत राहिल्यावर एक जग लागले... सुंदर , प्रकाशित, हवेहवेसे वाटणारे, जे त्या क्षणापर्यंत कुठेतरी खोल लुप्त होते. मी हळूच त्या स्वप्नाच्या जगात शिरले. पण तो प्रकाश सदा माझ्या ह्रदयाच्या एका कप्यात साठून होता. त्याचा निरोप घ्यावासा कधी वाटलेच नाही. तो इवलासा तारा नाही तर माझ्यासाठी तो सूर्यच होता जो फक्त माझ्यासाठीच तेव्हा उगवला होता असेच वाटत होते.माझ्यासारख्या हजारो जीवांना प्रकाशमान करणारा हा सूर्य नियमित माझ्या आठवणींच्या आकाशात स्वैर करत असतो.खरेच कधी कधी या आभासी सुंदर स्वार्थी जगात या कोलाहलातही खूप एकटे वाटते, अनेकदा त्या तेजाची उणीव भासते आणि तेव्हा तेव्हा त्या प्रकाशाने निर्माण केलेली माझ्यातील सकारात्मक ऊर्जा कामी येते. पुन्हा एकदा हेलकावे घेत असलेला जीव तोल सांभाळतो, नव्या पंखांना स्वप्नांचे नवे पर येतात आणि आकाशी झेप घेण्यासाठी मन तयार होते. 

माझ्यासारख्याच कितीतरी मुलांवर हा देवदूत गेल्या कित्येक वर्षांपासून माया करत होता. त्या प्रेमाच्या स्पर्शात नेहमीच एक दिव्य शक्ती होती. त्याच्या सहवासात एक विश्वसनीय आधार होता. एका छोट्याशा खाडीकिनारी वसलेल्या गावाला शैक्षणिक महत्त्व प्राप्त झाले ते याच देवदूतामुळे. कितीतरी विद्यार्थ्यांचे भविष्यच फक्त उजळले नाही तर त्यांच्या सहवासात आलेला प्रत्येक विद्यार्थी एक आदर्श मानव बनला. अनेक अनाथांना हक्काचा नाथ वयाच्या योग्य वेळी मिळाला आणि त्यांच्या जीवनास एक अर्थ प्राप्त झाला.फादर ऑर्लॅंडो म्हणजे फक्त शिक्षणाचीच नव्हे तर मायेची,शिस्तीची,वात्सल्यतेची ,धर्मनिरपेक्षतेची, अजोड परिश्रमाची, साकारत्मकतेची प्रतिमा होती. एक अनोखे व्यक्तिमत्त्व ज्यांच्याही सहवासात आले त्यांचे जीवन आज फुलले आहे. पण म्हणतात ना, देव त्याचा एक अंश मानव कल्याणासाठी पृथ्वीवर पाठवतो आणि त्याचे कार्य समाप्त झाले कि तो अंश पुन्हा त्या दैवी अनंतात विलीन होतो. २९ ऑक्टोबर २०१७ रोजी एका अशाच दैवी अंशाचा, अनेक जीवांना प्रकाशित करणाऱ्या दिव्य ज्योतीचा अखेर त्या अनंत सूर्याच्या स्वर्गतेजात प्रवेश झाला. 
त्या तेजस्वी ताऱ्यास भावपूर्ण श्रद्धांजली !!!


फादर ऑर्लॅंडो, तुमच्या मुळेच आज माझ्या जीवनाला एक नवा आकार आणि अर्थ मिळाला. माझ्या या सुंदर जीवनाचे जर कोणी शिल्पकार असेल तर ते तुम्हीच.माझ्यावर तुम्ही ठेवलेल्या अतूट विश्वासामुळेच आज मी इथवर पोहोचली आहे असे वाटते. खरेच तुमच्यासारख्या निःस्वार्थी लोकांची या जगात खूप कमी आहे आणि मी खरोखर खूप धन्य आहे जिला हा सहवास अगदी जवळून लाभला. आयुष्याची १९ वर्षे मी तुमच्या छत्रछायेत वाढत गेले... शिक्षणाने , विचारांनी आणि जगायला शिकवणाऱ्या प्रत्येक गोष्टीने.लहानपणी वाढदिवसादिवशी तुम्हाला पाहणे म्हणजे एक कुतूहल वाटे ,कॉलेजमध्ये असताना तुमच्या सोबत केलेले विचारविनिमय, कॉलेजमध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून वावरत असताना टेलीफोनवरही बोलताना वाटणारी भीती आणि हॉस्टेलमध्ये असताना घडलेल्या गमती जमती, एकदा तुमचे पोर्ट्रेट काढण्याचा माझा प्रयत्न आणि त्यानंतरची तुमची कौतुकाची थाप ,माझ्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या दहावीच्या निकालाचे तुमच्या हातून मिळालेले पारितोषिक , जेव्हाही मी अडचणीत सापडेल तेव्हा तुमचे देवदूतासारखे समोर उभे असणे , गेल्या ५-६ वर्षांतल्या भेटी ... आजही त्या सर्व आठवणी या मनाच्या तारांगणात तेजोमय आहेत. माझ्यासाठी पितृतुल्य असलेल्या तुमच्याकडून मला फक्त मदतच नाही तर जगावे कसे हा अमूल्य धडा मिळाला. तुमच्या कडून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या, शिक्षणाच्या , मायेच्या,विश्वासाच्या,ज्ञानप्रकाशाच्या आणि तुमच्या सोबत असलेल्या सर्वच आठवणींच्या स्वरूपात तुम्ही नेहमीच आमच्या सोबत राहाल.  

Rest In Peace ... Miss you !!!
 - रुपाली ठोंबरे.

Wednesday, October 25, 2017

Golden drops of life

आजची पहाट एक नवीनच आणि एक सुंदर अनुभव घेऊन माझ्या जीवनात आली. कारण आज पहाटे ४ वाजताच मला उगवत्या सूर्याचे दर्शन घडले आणि तेही अगदी जवळून...आणि त्यासोबत माझी संबंध सकाळ उजळून निघाली. तुम्ही म्हणाल पहाटेचे साखरझोपेतले स्वप्न बिप्न पाहिले असेल या वेडीने. पण तुमचा हाही अंदाज चुकला बरे का!

जे जे मनात वसते ते सारे स्वप्नातच पाहायला हवे असे थोडीच आहे. आणि त्यासाठीच तर देवाने आपणा प्रत्येकाला एक कलेचे दुपटे आपल्यासोबत पाठविले आहे. कोणाला नृत्य तर कोणाला गायन , कोणी लिहिण्यात तर कोणी रेखाटण्यात स्वतःला व्यक्त करत असतो. मीही दैवकृपेने अशाच एका कलेने बऱ्यापैकी समृद्ध आहे आणि त्यातूनच आज हा माझ्या कल्पनेतला सूर्य मी समोर कॅन्व्हासवर निर्माण केला. आणि या सूर्याच्या निर्माणाने एका वेगळ्याच आनंदात मी स्वतःला न्हाऊन घेतले.

Aboriginal आर्ट माझ्यासाठी एक नवीन पण खूप सुंदर चित्रप्रकार. नेटवर काही शोधता शोधता ऑस्ट्रेलिया मधील या चित्रकलेशी परिचय झाला. फक्त ठिपके आणि काही विशिष्ट संज्ञाचित्र वापरून तयार केलेले चित्र. यात कसोटी असेल ती तुम्ही निवडलेल्या रंगसंगतीची. पाहता क्षणीच मी या चित्रांच्या प्रेमात पडले. वर वर पाहायला सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते काढायला बसणे म्हणजे तुमच्या धीर-चिकाटीची परीक्षाच. अचूक रंगसंगती आणि एकाच वलयातील विविध ठिपक्यांच्या आकारातील साम्य यावर त्या चित्राचे सौन्दर्य अवलंबून असते.

बहुदा या प्रकारात पाल , बेडूक साप ,कासव ,कांगारू असे विविध प्रकारचे प्राणी चितारले जातात आणि ते खरोखर सुंदरही दिसतात. पण घरातल्या हॉलसाठी काही बनवते आहे म्हटल्यावर काहीतरी वेगळे आणि ऊर्जा देणारे काही करूया असा विचार केला. आणि मग कल्पनेतला सूर्य हळूहळू ठिपक्या ठिपक्यांनी कागदावर उतरू लागला. रात्रीच्या काळोखात सुरु केलेला हा ठिपक्यांचा खेळ सकाळी अंदाजे ७-७.१५ वाजता संपला आणि त्यातून निर्माण झालेल्या सूर्यकिरणांमुळे खरोखर अंगभर आनंदाचे ओहोळ वाहू लागले.एकाच वेळी असंख्य समाधानाचे क्षण माझ्या दिशेने धावू लागले. खरेतर कमी झोप झाल्यामुळे आणि एकाच ठिकाणी बसून राहिल्याने एक प्रकारचा आळस किंवा निरुत्साह अपेक्षित असतो पण उलट नेहमीपेक्षा आज अधिक प्रसन्न वाटत होते. त्या प्रत्येक सोन्याच्या कणातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा असेल का कि ही आणखी कोणती नवी जादू?


Golden drops of life showered by Sun
ही अद्भूत जादू तर आहेच, केवळ माझ्याच नव्हे तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात लपलेली असते. जादू... आपल्या आवडत्या छंदाची.' जे न दिसे स्वप्नी ते ते सारे दिसे या कविमनी ' या उक्तीप्रमाणे एका कलाकारास देवाने कला ही इतकी मोठी देण दिली आहे कि ज्यामुळे अशक्यही शक्य करण्याची ताकद प्रत्येकात निर्माण होते. आणि जे जे आवडते ते ते करायला थकवा कधीच आड येत नाही. आणि आजच्या धकाधकीच्या थकलेल्या जीवनात अशा कलेच्या माध्यमातून नवा उत्साह आणि नवीन ऊर्जा मिळवण्याचा हा एक अतिशय सोपा उपाय.आज प्रत्येकाकडे वेळ मिळत नाही हे एक अपेक्षित तयार कारण जरी असले तरी स्वतःच्या आनंदासाठी आणि इतरांच्या सुखासाठी तो थोडासा काढण्यात काही गैर नाही. खरे तर मी तर म्हणेन वेळ हा कधीच मिळत नसतो तो नेहमी काढावा लागतो फक्त आपल्या हातात असलेला त्याचा अग्रक्रम आपण कोणत्या गोष्टीला देतो ते महत्त्वाचे.

मग चला तर आजपासूनच या सांसारिक आणि व्यावसायिक जीवनात गुरफटून गेलेल्या मनाला थोडे मोकळे करूया, त्याच्यासोबत दोन गप्पा मारूया , नक्की तुला सुखी होण्यासाठी काय आवडते ते पाहूया आणि मग बघा स्वतःलाच आपल्यातील कलेचा एक झरा सापडेल ज्यातून येणाऱ्या जीवनाची गोडी क्वचितच इतर कोणत्या सुखात मिळेल. तो छंद म्हणून जवळ घ्या , त्याला मनापासून जोपासा आणि मग त्यातून वाहणारी आनंदाची नदी एका विशाल सुखसागराकडे घेऊन जाईल जिथल्या शिंपल्यातही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावेसे वाटेल. आणि कोणास ठाऊक एखादे दिवशी सुयोगाने स्वाती नक्षत्रात एखादा पावसाचा थेंब त्या शिंपल्यात प्रवेश करेल आणि आपल्या अर्थहीन जीवनाचा अनमोल मोती तयार होईल.


- रुपाली ठोंबरे.

Tuesday, October 17, 2017

पावसाळी दिवाळीच्या रिमझिम शुभेच्छा.

" आई, मला भुईचक्र पाहिजे , पाऊस पाहिजे "
" अरे विनू , इतका नको तो पाऊस पडतोच आहे कि. त्यात तुला आणखी काय पाऊस पाहिजे आहे आता "
शेजारच्या घरात सुरु असलेला विनू आणि त्याच्या आईचा हा संवाद कानावर पडला. आणि मनात एक चक्र सहजच सुरु झाले. चक्र ... दिवाळीच्या या ५ दिवसांचे...दरवर्षी नव्याने येणारे जे आज खूपच निराळे झाले आहे... निसर्गाच्या बदललेल्या ऋतुचक्रामुळे.


हा पाऊस जातो जातो म्हणतो
आणि कुणास ठाऊक का हा जातच नाही
गणपती पावसात चिंब भिजून गेले
यावर्षी रास-गरबाही पाण्यातच रंगला
ऑक्टोबरची गरमी ची चिंता वाटावी
तिथे  ऐन दिवाळीतसुद्धा पाऊस सरी
आणि तो ही रिमझिम थेंबथेंब नव्हे
तर मुसळधार कोसळणाऱ्या धारा
आपण म्हणतो,
आम्ही दिवाळीचे स्वरूप बदलले
पण आता आणि आज पाहून वाटते
निसर्गानेही दिवाळीत आपले रूप पालटले
जून आहे कि ऑक्टोबर हे जसे न सुटलेले कोडे तसेच
इतरांप्रमाणेच मलाही खरंच कळत नाही हो यावर्षी 
नक्की चकली,करंजी तळावी कि तळावी कांदाभजी
कळतच नाही मुळी... हिवाळा सुरु आहे कि सुरु झाला पावसाळा ?
आधी कशी दिवाळी म्हटली
कि असायची खूप मोट्ठी खरेदी
नवे कपडे,नवे दिवे, नवे फटाके
आणि आता खरेदी तर असतेच हो
पण ती फक्त तांत्रिक आणि चायनीज
यावर्षी तर अशा खरेदीलाही
साधा एक दिवस मोकळा मिळत नाही
संध्याकाळी पाच वाजले किंवा सुट्टीचा वार आला
कि आलाच हा आभाळात दडून बसलेला पाऊस दारात
आधी कसे डबे भरून फराळ असायचा
आता नावापुरती मिठाई असते प्रत्येकघरी
पण या वर्षी तीही करायला अनेक अडचणी
ना वाळवायची सोय ना साठवण्याची हवा
नावापुरता केलेला फराळसुद्धा
दोन दिवसांनी खावासा वाटत नाही
पूर्वी अंगणात एखादी ठिपक्यांची रांगोळी सहज रेखली जाई
आता रांगोळ्यांचे स्वरूप बदलून ठसे रंगू लागले घरासमोर
आज तर ते ही रंग काही काळातच पाण्याने वाहून नेले
पूर्वी उटण्याचे अभ्यंगस्नान म्हणजे खरी दिवाळी
आता सुवासिक साबणांत सुवासिक होते दिवाळी
या वर्षी तर मातीच्या सरीस्पर्शानी गंधाळली दिवाळी
पूर्वी तेलाच्या मातीच्या दिव्यांनी अंगणात तारांगण अवतरायचे 
हल्ली मेणाच्या सुशोभित दिव्यांनी तेच तारांगण रंगीत भासायचे 
आज तर पाऊस-स्पर्शाने हे तारांगण विरून उरतो तो फक्त अंधार 
जो पुन्हा पुन्हा दूर होईल नव्या तेजाने , नव्या जाणिवेने
दिवाळी दिवशी आकाशी चांदण्यांचा सडा असे
आज मेघांच्या गडद चादरीत चांदण्या दिसेचना
पूर्वी रोज रात्री सर्वत्र दिव्यांचा लखलखाट असे
यावर्षी तर आकाशातसुद्धा आहे विजेचा लखलखाट
थोडक्यात काय निसर्ग सुद्धा यावर्षी दिवाळी साजरी करतोय
पूर्वी कानठळ्या देणारे आवाज असत फक्त फटाक्यांचे
पण आज गडगडाट करत घुमणारा ढगांचा ढोल घुमे नभात
पूर्वी घरासमोर उंच लावलेला कागदी कंदील म्हणजे घराची शान
आज हा कंदील भिजू नये म्हणून आत आणावा लागला
पूर्वी दिवाळी म्हटली कि नाते जपणे आणि आल्या भेट- गाठी
आणि आज तर मनाने अन पावसानेही व्यस्त झालीत नाती
खरंच पाऊस हवाहवासा वाटतो खरा
पण इतकाही नको कि तो नकोसा व्हावा
आधीच सणांतली पूर्वीची अर्धी मजा आयुष्यात कमी झाली
त्यात पावसाच्या नव्या वर्दीने दिवाळीसुद्धा थोडी अडखळली.


तरी माझ्यातर्फे सर्वानाच पावसाळी दिवाळीच्या रिमझिम शुभेच्छा. 
हि दिवाळीसुद्धा तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या आयुष्यात सुखाच्या गारव्यासंगे आनंदसरी घेऊन येईल अशी शुभेच्छा.


- रुपाली ठोंबरे.

Wednesday, October 11, 2017

शुभेच्छांचे इंद्रधनू


आज पुन्हा नव्याने तुझ्या आयुष्यात 
सुखाच्या वाऱ्यासंगे श्रावण सुरु झाला 


आज दिवसभर मेसेजरुपी कितीतरी विजांनी 
तुझ्या मोबाईलचे आभाळ लख्ख भरून जाईल 
मधूनच एखादी मेघगर्जना करत कॉल येईल 
आणि मग पडेल शुभेच्छांचा पाऊसच पाऊस 

त्या आनंद देणाऱ्या शुभेच्छा-सरींमध्ये बघ
माझीही एक कवितेची सर आली असेल धावून 
हळुवार झेलून घे तिलाही तुझ्या सुख-क्षणांत 
आणि बहरू दे या जीवनाचा बगीचा पुन्हा नव्याने 

देवाच्याही सरी मागते तुझ्यासाठी मी प्रार्थनेत 
बरसू दे त्याही घेऊन आशीर्वादाच्या गार गारा 
सोनसळे मायेचे ऊन आणि प्रेमाचे गोड झरे 
येऊ दे जीवनी इंद्रधनू स्वप्नांचे घेऊन रंग सारे


-रुपाली ठोंबरे .




Friday, September 22, 2017

रंग पसरलेले

पावसाळा सरत  जातो आणि सर्वपितरी अमावस्येनंतर पावसाचा जोर जरा कमी होऊ लागतो. पाऊस जातो जातो म्हणतो पण तरी त्याची अचानक अशी न सांगता असणारी हजेरी टाळता येत नाही. तो तेव्हाही येतोच पण फक्त भेटण्यासाठी.

याच काळात गणपतीनंतर नवरात्रीचे वेध सर्वाना लागलेले असते.देवी हे एक स्त्रीचेच रूप आणि नवरात्र हा देखील प्रामुख्याने स्त्रियांचा सण. अनेकांचे व्रत-उपास असतात. घटस्थापना तर असतेच पण विशेष आवडीचा भाग असतो तो रासगरबा आणि दांडीयाचा. असा हा नऊ दिवसांचा सण म्हणजे देवी आगमनासोबत येणारा उत्साह , आनंद आणि जल्लोष असतो.

फक्त गृहिणीच नव्हे तर ऑफिसला जाणाऱ्यांसाठी सुद्धा हे नऊ दिवस म्हणजे फार विशेष असतात. नवरात्री सुरु होण्यापूर्वीच काही दिवसांपासून या नऊ दिवसांचे नऊ रंग सगळीकडे पसरू लागतात. मग अगदी साधी असो वा अगदी मॉडर्न, सर्वच जणी अगदी उत्साहाने या रंगांच्या उत्सवात सहभागी होतात. खाजगी पेक्षा सरकारी कार्यालयांमध्ये या उत्सवाचे मोठे स्वरूप पाहावयास मिळते. रेल्वे स्थानके , बसेस अशा गजबजलेल्या ठिकाणी तर त्या दिवसाच्या एका विशिष्ट रंगाचे सडेच्या सडे जागोजागी विखुरलेले असतात.

गेला आठवडा भरपूर पाऊस होता. त्यामागे नवरात्र आली आणि नवरात्रीच्या देवीचा पहिला रंग होता पिवळा. काल सगळीकडे पिवळ्या पेहरावांमुळे मुंबईतसुद्धा जेजुरीचे दर्शन घडत होते. आणि आज पाठोपाठ आलेल्या हिरव्या रंगामुळे सगळीकडे हिरवळीचे साम्राज्य पसरल्याचे भास होते. त्यावरूनच सुचलेले काही काव्यरूपात मांडलेले शब्द आणि त्यां शब्दांना प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव सरांनी कागदावर मांडून आज धन्य केले.


- रुपाली ठोंबरे


Friday, September 8, 2017

मी लिहिते...


मी लिहिते... 
हृदयातल्या भावना आणि
त्या भावनांत लपलेलं माझं अंतर्मन,
लपाछुपीच्या खेळात रमलेले 
सुख-दुःखाचे अनेक रंग,
कधी भूत कधी भविष्य-वर्तमान 
आणि यांत दरवळणारे अनेक क्षण ,
हकीकत आणि कल्पनांचे नाना गंध,
या जीवनमालेत माळलेले आठवांचे तुरे ,
गोड-कडू , चढउतारांचे सूरच सारे.

मी लिहिते... 
कारण खूप काही सांगावेसे वाटते 
मन मोकळे करून बोलावेसे वाटते 
गुपित मनीचे समोर कुणाच्या तरी उलगडावेसे वाटते
पण अनेकदा ऐकायला सोबत कुणीच  नसते 
कुणा सांगू कुणा नको हेच कित्येकदा कळेनासे होते 
मग उगाचच ती अस्वस्थतेची इंगळी जन्म घेते
पण मग मी शब्दांचे मोती भावनांच्या धाग्यात 
गुंफायला सुरुवात करते 
आणि मग त्या माळेतून मी स्वतःच हळूहळू व्यक्त होत जाते 

मी लिहिते... 
नेहमीच स्वतःसाठी
स्वतःच्या भावनांना व्यक्त करण्यासाठी
मनात झालेला गुंता सोडवण्यासाठी
मनाचे मनाशीच असलेले नाते जपण्यासाठी
कधी कुणा अनामिकाला त्या भावना भावतात 
शब्दांचे हे तारांगण हवेहवेसे वाटू लागते 
आणि तिथेच माझ्या लिहिण्याला 
एक नवा अर्थ प्राप्त होतो . 

- रुपाली ठोंबरे.



Thursday, August 31, 2017

पावसातील छत्र

दुपारचे ३. १५ वाजले होते. समोर हा मुसळधार पाऊस कोसळत होता. मी विक्रोळीच्या एका बस थांब्यावर मोठ्या आशेने बसची वाट पाहत उभी. मुंबईत पावसाचा हाहाकार म्हणून सर्वच ऑफिसेस ,शाळा लवकर सुटत होत्या त्या दिवशी. आमचे ऑफिस देखील त्याला अपवाद नव्हते. ३ वाजता आम्ही सर्वच बाहेर  होतो. दिवसा दुपारी देखील काळ्या कुट्ट अंधाराने आकाशाला पांघरले होते. वारा सो सो करून सैरावैरा धावत होता. आणि त्याच्या सोबत पावसाच्या या सरी आवेगाने धरणीकडे झेपावत होत्या. समोरचे सर्वच धूसर झाले होते. जिथे पाहू तिथे फक्त पाणीच पाणी. मुंबईत पावसाचा पहिला जबरदस्त फटका बसतो तो मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलला. त्यामुळेच दररोज ट्रेनने प्रवास करणारी मी आज अशी बस स्टॉपवर उभी होते. मला अगदीच बसने अर्ध्या तासावर असलेल्या ठिकाणी जायचे असल्याने फारशी काळजी वाटत नव्हती. शिवाय बस नाही तर रिक्षा, ओला ,उबेर असतीलच गरज पडली तर ऐन वेळी म्हणून वरवरचे मन जरी निश्चित असले तरी मनाच्या एका कोपऱ्यात काळजीचे खोल काहूर होते.

बराच वेळ झाला तरी नेहमी ५-५ मिनिटांवर येणारी एकही बस नजरेस पडत नव्हती. समोर होता तो फक्त एक कोलाहल- गाड्यांच्या हॉर्नचा , लोकांचा आणि या चवताळलेल्या पावसाचा. जवळजवळ अर्ध्या तासाने एक बस आली ती गच्च भरूनच. बसच्या अगदी खालच्या पायरीवर देखील २ जण कसेबसे उभे होते. हे पाहून क्षणभर बसला पाहून तिच्याकडे धावलेली माझी पावले तिथेच अडखळली . बस तशीच पुढे जात गेली न मी आता नव्या बसच्या वाटेकडे डोळे लावून उभी होते. पुढे १-२... ४ बसेस आल्या पण सर्वांची तीच स्थिती. अजिबात चढायला वाव नाही. शेवटी वैतागून मी माझा मोर्चा रिक्षाकडे वळवला. एका हातात छत्री आणि दुसऱ्या हाताने थांबण्याचे इशारे करीत गेला तासभर तिष्ठत उभ्या असणाऱ्या लोकांमध्ये मी पण सामील झाले. पण बहुतेक रिक्षा भरून येत. आणि ज्या १-२ रिकाम्या मिळत त्यांना माझ्या मार्गावर येण्यात रस नसे. रस म्हणण्यापेक्षा त्यांना आज नको ते भाडे घेऊन पुढे अडकण्यापेक्षा सुरक्षित जागी जाऊन उभे राहणे सोयीस्कर वाटे. अंदाजे १५ -२० रिक्षांकडून नकार ऐकल्यावर मात्र मी माझे नवे अस्त्र बाहेर काढण्याचे ठरवले. पण छे ! ओला , उबेर यापैकी काहीच त्या समयी उपलब्ध नव्हते. तेव्हा मात्र काळजीचे सावट चेहऱ्यावर झळकू लागले. नुसत्या पावलांना भिजवणाऱ्या पाण्याची पातळी आता गुडघ्यापर्यंत पोहोचली होती. इथे तिथे फक्त पाणीच पाणी आणि त्या पाण्यात वाहत येणारा कचरा मनाला अस्वस्थ करत होता खरा पण या अस्वस्थतेपेक्षा समोर आलेले संकट कितीतरी मोठे भासत होते. जवळजवळ दिड तास हा असाच घालवल्यानंतर मी पुन्हा एकदा त्या पाण्यात उतरले. पुन्हा रिक्षा शोध सुरु झाला. डोक्यावरची छत्री आता केवळ नाममात्र उरली होती. त्या कोसळणाऱ्या पावसात चिंब भिजून आता थंडी देखील जाणवू लागली. एकवार मोबाईल पहिला आणि एक नवे टेन्शन सुरु झाले. फोनचा चार्ज केवळ १८ %. ... झाले. आता काय करावे काही सुचेनासे झाले. जाण्यासाठी एक वाहन नाही आणि क्षणाक्षणाला वाढणारा हा पाऊस मनाचे धैर्य खचवू लागला. पुन्हा माघारी ऑफिसमध्ये जायचे का? कि घराच्या दिशेने चालायचे ?या दुहेरी प्रश्नात मन थोडेसे अडखळले पण लगेच त्याने  निर्णय घेतला होता आणि पाऊले घराच्या दिशेने चालू लागली. पाण्याचे रान सपासप उडवत याच वेगाने घराकडे निघाले तर २.५-३ तासांत घर नक्कीच गाठेन असे वाटत असले तरी ते इतके सोपे नाही हे देखील मला ठाऊक होते. चालता-चालता भांडुप कडे जाणारी रिक्षा शोधणे मात्र मी अजिबात थांबवले नाही. जेव्हा रिकामी रिक्षा नकार देई तेव्हा एक प्रचंड कळ मस्तकात जाई. आज नाही तर पुन्हा केव्हा हे लोक गरजूना मदत करतील असे न राहवून सारखे वाटत होते आणि तेच नकळत तोंडावाटे निघे. पण कुणावरही त्याचा काहीच परिणाम नाही. मी आपली पुन्हा चालू लागले पुढे पुढे .... काही अंतर पार केल्यावर एक रिक्षा अचानक थांबली. 'भांडुप?...तिथे जायचे असेल तर या. ही रिक्षा भांडुपलाच जातेय.'त्याक्षणी जो काही आनंद मी,मला झाला तो काय वर्णू मी . मी त्वरेने रिक्षात शिरले. ओले चिंब झालेले अंग थरथरत होते पण एक खूप मोठा दिलासा मिळाला.मी तिला सारखे 'धन्यवाद' म्हणू लागले तसे तिने तिची कहाणी सांगण्यास सुरुवात केली. तीदेखील जवळजवळ १ तास रिक्षासाठी उभी होती तेव्हाच हा भांडुपलाच राहणारा रिक्षावाला तिला भेटला आणि तिचा हा प्रवास सुरु झाला होता. त्यामुळेच ती माझी व्यथा नक्कीच समजू शकली असेल आणि तिने मला लिफ्ट दिली असेल. पुढे तिच्या स्टॉपवर तिला निरोप दिल्यानंतर त्या रिक्षावाल्याने देखील खूप मदत केली. जिथवर त्याच्यासाठी शक्य असेल त्याने मला घराच्या जवळपर्यंत सोडण्याचा प्रयत्न केला.

त्या दिवशी वाटले खरेच संकटात कधीकधी चांगले कर्म असेल तर देव भेटतो असे म्हणतात ते खोटे नाही. ती मुलगी किंवा तो रिक्षावाला त्यांपैकीच तर एक नसतील ना? जीवनात बरेचदा असे प्रसंग घडतात जिथे मन सुन्न होते आणि मार्ग सापडत नाही आणि एखादा तिसराच अनोळखी तुमच्यासाठी नवा मार्ग दाखवणारा दिवा घेऊन येतो अशा सर्वांसाठी कृतकृत्य असायलाच हवे. म्हणूनच म्हणतात कि चांगली कर्मे करा, कोण जाणे पुढे कोणत्या स्वरूपात देव येऊन तुम्हाला भेटेल.

- रुपाली ठोंबरे.

Thursday, August 24, 2017

बाप्पा...लवकरच ये आता



आज एक वर्ष पूर्ण झाले, बाप्पा...तुला तुझ्या घरी परत जाऊन...
आणि
आता पुन्हा चाहूल लागली... ती तुझ्या आगमनाची.
बाप्पा,काय सांगू मी तुला?
कित्ती वाट पाहत होते मी या दिवसाची.
कारण तुझ्यासोबत सर्वच 
हरवलेलं परत येतं ना आपसूकच...
पण काही म्हण, तू येतोस ते आनंद घेऊनच...
प्रसन्नतेचा सडा शिंपडत,
तुझ्या स्थानी विराजमान होतो,
तेही मोठ्या थाटात.
हाच थाट मला फार फार आवडतो...
पाहायलाही आणि तुझ्यासाठी करायलाही 
उद्या बघ, सारे रस्ते कसे 
तुझ्या जयघोषाने भरून येतील .
मुंबई, पुणे, नाशिकचं नव्हे तर परदेशातही 
तुझं स्वागत मोठं दणक्यात होईल.
साऱ्या दिशा ढोल पथकांनी दुमदुमतील...
ताशांसवे लेझीमही फेर घेऊन नाचेल...
गणेशगीतांनी वारे भक्तिमय होतील...
अबीर गुलालाचे मेघ सर्वत्र पसरतील...
आणि सर्वांवर पाऊस होईल,
तो तुझ्या गोड आशीर्वादाचा .
घराघरांत दूर गेलेले जवळ येतील...
सारे रंग एकमेकांत मिसळून जातील ...
रम्य आरास, सोबत रोषणाईची मेखला,
गोडधोडाची तर स्पर्धाच सुरु असेल, 
त्यातही मोदकाला मोठा मान... 
फळा-फुलांची तबके, नैवेद्याचे ताट... 
असा सुरेख थाट फक्त तुझ्यासाठी.
दिव्यांच्या प्रकाशात तुझे साजिरे रूप,
मनाचा अंधार हळूच दूर करत असते
आज त्याच तुझ्या गोजिऱ्या रूपाची आस आहे ,
तुझ्या दर्शनाचा या जीवाला खूप मोठा ध्यास आहे...
देवा, वेशीवर पोहोचलाच आहेस
आता जास्त वेळ नको दवडूस.
बाळ, राजा अशा कोणत्याही रुपात ये ...
पण उद्या लवकरच ये तुझ्या भक्तांसाठी.
हे काय , आम्ही तयारच आहोत बघ
दारी आतुरतेने तुझ्या स्वागतासाठी.



" गणपती बाप्पा मोरया 
वाट पाहतो आम्ही,
तुम्ही लवकर या 

एक दोन तीन चार 
 गणपतीचा जयजयकार !!!"

                                                        - रुपाली ठोंबरे. 
वाचण्यासारखे अजून काही :
 

Friday, August 18, 2017

विश्वासांकुर

त्या एका निमिषात 
योग असा सुरेख जुळून आला 
कळत नकळत आज
नव्या नात्याचा जन्म झाला 

विश्वासाच्या अंकुरातून  
मैत्रीच्या पानांना बहर आला 
दूरवरच्या जुन्या नात्यातून 
मायेचा वटवृक्ष पल्लवित झाला 

त्या दो निखळ जीवांची
होती एकाच नावेतील व्यथा 
त्या प्रांजळ संवादाची 
आरंभ-अंत जणू एकच कथा 

आठवणींनी साठलेले 
 कुंभ मनांचे आज झाले रिते
शब्दांनी गुंफून फुललेले  
 भिजले तृप्तीत पुन्हा नव्याने नाते  

सुख-दुःखाच्या आठवांचे 
बरसले शब्द भावनांचे सहज
गुंतलेले गणित आयुष्याचे 
उलगडत गेले नकळत आज 

न विचारलेल्या प्रश्नांना 
आज मिळाली भावनांची उत्तरे 
गुदमरलेल्या श्वासांना 
आज गंधाळती सहवासाची अत्तरे

- रुपाली ठोंबरे.





Wednesday, August 16, 2017

शुभेच्छा साखरपुड्याच्या !!!



 या हातातून त्या अनामिकेत 
 त्या हातातून या अनामिकेत 
आजच्या सुदिनी 
झाले दो अंगठ्यांचे स्थलांतरण 

साखरपुड्याच्या सोनसोहळ्यात 
दो अनोळखी जीवांचे झाले  
आजच्या सुदिनी 
गोड प्रेमाच्या नात्यात रूपांतरण 

शुभेच्छा साखरपुड्याच्या !!!

- रुपाली ठोंबरे. 

Thursday, August 3, 2017

गप्पा...जीवनाचा एक अविभाज्य घटक

चारचौघी एकत्र आल्यात.... कि हमखास रंगतात त्या गप्पा.अगदी बायकाच नाही तर पुरुष असतील तर तेही दोन जण एकत्र आले कि मग सुरु होतो गप्पांचा एक रोजचाच वाटणारा पण रोज नवा वाटणारा शाब्दिक प्रवास...मग त्याला वयसुद्धा बंधन नसते. फक्त जसजसे वाढत जाते, तसतसे या गप्पांचे स्वरूप मात्र हमखास बदलत जाते...पण तरी माणूस म्हणून जन्माला आलो आणि बोलायला येऊ लागले तसे चार नवे शब्द सुचू लागले, रोज नवे अनुभव जीवनाच्या अंगणात खेळू लागले आणि गप्पा हा एक रोज नवा वाटणारा पण जुनाच सवंगडी कायमचा या जीवाला चिकटून बसला. पुढे अनेक मित्रमैत्रिणी भेटतात , नातेवाईकांची संख्या वाढत जाते पण त्या  सवंगड्याच्या सहवासातच जगातील सारी नाती खऱ्या अर्थाने फुलू लागतात ... आणि मग  जीवन प्रवास दिवसेंदिवस बहरत जातो . कधी या गप्पांमध्ये आनंदाचा दरवळ असतो तर कधी कटकटी, तक्रारींचा वास, कधी भूतकाळी आठवणींच्या कथा तर कधी भविष्यासाठी नवा मार्ग. खरेच अशाप्रकारे, या गप्पा सर्वांच्याच जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे.

 त्यादिवशी सहजच बागेत फेरफटका मारत असता विविध वयाची विविध प्रकारचे लोक दिसत होते. कुठे छोटीशी रिया ,प्रिया,टिनू आणि मिनू त्यांच्या भातुकलीच्या खेळांतली मज्जा एकमेकांना छान हावभाव करत कथन करत होत्या तर बाजूलाच बंटी आणि मिंटू आपल्या नव्या पराक्रमांची गाथा एकमेकांना ऐकवत होते.६ वर्षांच्या खालील मुले जितके नाजूक तितक्याच त्यांच्या बोबड्या बोलांमधले संभाषण देखील निरागस. एका ठिकाणी शाळेत जाणारी मुले गृहपाठाच्या याद्या मनात गिरवत होते तर मध्येच इकडच्या तिकडच्या गोष्टी पंख फुटून त्यांच्याजवळ यावे तसे नवनवे विषय त्यांच्या गप्पांमध्ये येत. तरुण मुलं मुलींचे तर जगा वेगळे विषय सुरु असतात. कधी त्यांत प्रेमाचे अंकुर फुटत असतात तर कधी आणखी काही. या वयाकडे सर्वात जास्त गप्पांचा साठा असतो. स्त्रियांचे म्हणाल तर गप्पा अगदी ठरलेल्या...लग्नाच्या वयात आले कि स्वतःच्या सौन्दर्यापेक्षा आणखी कोणताही विषय खास वाटू नये... लग्न झाले कि सासर आणि माहेर या भोवती त्यांच्या गप्पांचा सारा पसारा... त्यातही हमखास न चुकता कुणाची वारंवार नोंद होत असेल तर ती म्हणजे सासू आणि नवऱ्याची. आई असेल तर तिला जिथे तिथे फक्त आपले मुलच दिसत असते... मग त्या यशोदेच्या बोलण्यातही नित्य तिचा कान्हा अथवा राधाच असते. या स्त्रियांच्या गप्पांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या आपल्या इतकीच इतरांची देखील फार दाखल घेतात. कुणाचे काय सुरु आहे हे जाणून घेण्यात विशेष रस. वयानुसार त्यांचे विषय भले कितीदेखील बदलत राहतील पण त्यांचा गप्पांचा स्टॅमिना मात्र सेम असतो. पुरुषांच्या गप्पांत घरातल्या कुरकुरीपेक्षा आजूबाजूच्या सामाजिक घडामोडींची ओढ जास्त दिसून येते. आणि आपले आजीआजोबांच्या वय म्हटले कि अध्यात्म ,नाती ,जुने दिवस ,आजचा वर्तमान यांची गर्दी अधिक. तर थोडक्यात सांगायचे तर वय , प्रकार कितीही असले तरी गप्पा असतातच फक्त प्रत्येकाचा आपला छंद मात्र निराळाच.

या झाल्या आपण नित्यनेमाने पाहत आलेल्या गप्पा पण कोणी म्हणे स्वतःबरोबर देखील गप्पा माराव्या... किंवा देवाबरोबर गप्पा माराव्या. अरे पण असे केले तर लोक वेडा नाही का म्हणणार? पण हे देखील खरेच बरे. क्षणभर विचार केला तर आपल्याही बुद्धीला पटेल कि आत्मचिंतन सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. कधीकधी वायफळ गप्पा मारण्यात आपल्या वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा कधीतरी स्वतःतल्या स्वतःला सुद्धा भेटण्याचा प्रयत्न केला तर ...? इतरांशी मारतो तशा गप्पा कधीतरी स्वतःशीदेखील केल्या तर ... ? त्यातून बऱ्याच न उच्चारलेल्या प्रश्नांची ओळख होईल...  कदाचित अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील... नवे मार्ग... नवे प्रोत्साहन... कुठेतरी न सांगता येणारी गोष्ट सांगितल्याने एक वेगळेच समाधान मिळेल... आणि मन कसं मोकळं होऊन जाईल.


- रुपाली ठोंबरे.
सदर लेख वृत्तपत्रात छापून आला आहे.


Blogs I follow :